

पुढारी ऑनलाईन डेस्क : U-19 T-20 WC : महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. भारताची कर्णधार शेफाली वर्मा हिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत किवी संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि एकापाठोपाठ एक त्यांचे फलंदाज तंबूत पाठवले. त्यामुळे न्यूझीलंडला 20 षटकांत 9 गडी गमावून 107 धावांपर्यंतच मजल मारता आली. जॉर्जिया प्लिमर 35 आणि इसाबेला जॉर्ज 26 यांनी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. भारताकडून पार्श्वी चोप्राने सर्वाधिक तीन बळी घेतले. तीतस साधू, मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि अर्चना देवी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
न्यूझीलंडची पहिली विकेट तीन धावांवर पडली आणि दोन्ही सलामीवीर पाच धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतले. अॅना ब्राउनिंगने एक आणि एम्मा मॅक्लिओडने दोन धावा केल्या. यानंतर जॉर्जिया प्लिमरने एक टोक सांभाळले. तिला इसाबेलने चांगली साथ दिली. तिने 22 चेंडूत 26 धावा केल्या आणि किवी संघाला सामन्यात कमबॅक करण्यास मदत केली. कर्णधार शार्पही 13 धावा करून बाद झाली. न्यूझीलंडचा निम्मा संघ 74 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर एम्मा इर्विन तीन, केट इर्विन दोन, लॉगनेबर्ग चार आणि नताशा तीन धावांवर बाद झाली. दरम्यान, वेगवान धावा काढण्याच्या प्रयत्नात 32 चेंडूत 35 धावा केल्यानंतर प्लिमरही बाद झाली. नाइटच्या 12 धावांच्या खेळीने न्यूझीलंडची धावसंख्या 100 धावांच्या पुढे गेली. अखेर न्यूझीलंडचा संघ नऊ गडी गमावून 107 धावाच करू शकला.
92 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची आठवी विकेट पडली. पायगे लोगेनबर्ग आठ चेंडूत चार धावा करून बाद झाली. तिला ऋषिता बसूने धावबाद केले. यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या 18 षटकांत आठ बाद 92 होती.
91 धावांवर न्यूझीलंडची सातवी विकेट पडली. अर्चना देवीने सर्वाधिक धावा करणाऱ्या प्लिमरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. प्लिमरने 32 चेंडूत 35 धावा केल्या. पार्श्वी चोप्राने तिचा झेल टिपला. 18 षटकांनंतर किवी संघाची धावसंख्या सात गडी बाद 92 होती.
83 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची सहावी विकेट पडली. कर्णधार शेफाली वर्माने केट इर्विनला मन्नत कश्यपकरवी झेलबाद केले. इर्विनने आठ चेंडूंत दोन धावा केल्या.
न्यूझीलंडचा निम्मा संघ 74 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पार्श्वी चोप्राने एम्मा इर्विनला बाद करत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. इर्विनने 10 चेंडूत तीन धावा केल्या. तिचा ऋषिता बसूने झेल पकडला.
63 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. पार्श्वी चोप्राने सोनम यादवकरवी इझी शार्पला झेलबाद केले. न्यूझीलंडची कर्णधार शार्पने 14 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 13 धावा केल्या.
पाच धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. एम्मा मॅक्लिओडला एलबीडब्ल्यू करून तितास साधूने किवी संघाला आणखी एक धक्का दिला. मॅक्लिओडने पाच चेंडूंत दोन धावा केल्या. चार षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन बाद 15 धावा होती.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाची पहिली विकेट तीन धावांच्या स्कोअरवर पडली. मन्नत कश्यपने ब्राउनिंगला सौम्या तिवारीकरवी झेलबाद केले. ब्राऊनिंगने पाच चेंडूंत एक धाव केली. तीन धावांच्या स्कोअरवर पहिला विकेट पडल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला.
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), ऋषिता बसू, तितास साधू, अर्चना देवी, मन्नत कश्यप, पार्श्वी चोप्रा, सोनम यादव.
इझी शार्प (कर्णधार), इमा मॅक्लिओड, अॅना ब्राउनिंग, जॉर्जिया प्लिमर, इसाबेल गेज (यष्टीरक्षक), एम्मा इर्विन, केट इर्विन, पायगे लोगेनबर्ग, नताशा कॉर्डे, कायलेघ नाइट, अबीगेल हॉटन.