टीम इंडिया वन-डेतही नंबर वन | पुढारी

टीम इंडिया वन-डेतही नंबर वन

इंदूर; वृत्तसंस्था :  भारतीय संघाने इंदूर येथे झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी मात करून पाहुण्या संघाला मालिकेत 3-0 असा व्हाईट वॉश दिला. या विजयाने टीम इंडिया आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. रोहित शर्मा (101) आणि शुभमन गिल (112) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 9 बाद 385 धावांचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान पेलताना न्यूझीलंडने 41.2 षटकांत 295 धावांची मजल मारली. शार्दूल ठाकूर याला सामनावीर तर शुभमन गिलला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

भारताचे 386 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या किवींना दुसर्‍याच षटकात हार्दिक पंड्याने पहिला धक्का दिला. हार्दिकने फिन अ‍ॅलेनचा शून्यावर त्रिफळा उडवला. मात्र डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स यांनी किवींचा डाव सावरत दुसर्‍या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी रचली. ही जोडी अखेर कुलदीप यादवने निकोल्सला 42 धावांवर बाद करत फोडली. मात्र हेन्री निकोल्स बाद झाल्यानंतर सलामीवीर डेवॉन कॉन्वेने किवींच्या डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 71 चेंडूंत शतकी खेळी करत न्यूझीलंडला 24 षटकांत 175 धावांपर्यंत पोहोचवले. भारतासाठी ही जोडीही डोकेदुखी ठरत होती. मात्र शार्दुल ठाकूरने 26 व्या षटकात डॅरेल मिचेल (24) आणि टॉम लॅथम यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत किवींचा झंझावात रोखण्याचा प्रयत्न केला. शार्दुलनेच 28 व्या षटकात ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर बाद करत किवींची अवस्था 5 बाद 200 धावा अशी केली. शार्दुलच्या तीन विकेटमुळे भारताने सामन्यात कमबॅक केले. न्यूझीलंडच्या विकेट पडत असताना कॉनवे मात्र दुसर्‍या बाजूला खुंटा मारून बसला होता. त्याच्या जोडीला ब्रेसवेल आल्याने ही जोडी जमणे भारताला त्रासदायक ठरले असते. पण उमरान मलिकने कॉनवेला बाद करून हे टेन्शन दूर केले. रोहितच्या हाती झेल देण्यापूर्वी कॉनवेने 100 चेंडूंत 138 धावा केल्या. त्याने 12 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

पहिल्या डावातील शतकवीर मायकेल ब्रासवेल (26) याला कुलदीपच्या गोलंदाजीवर इशानने चपळाईने यष्टिचित केले. यानंतर मिशेल सँटनेर (34), लॉकी फर्ग्युसन (7), जेकब डफी (0) आणि थिकनेर (नाबाद 0) यांचा प्रतिकार संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, भारताची सलामीची किलर जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केलेल्या तुफानी शतकांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या वन-डे सामन्यात प्रथम फलंदाजी करत किवींसमोर 385 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 112 धावांची तर रोहितने 101 धावांची शतकी खेळी केली. या दोघांनी भारताला 212 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताचा डाव गडगडला. अखेर हार्दिक पंड्याने स्लॉग ओव्हरमध्ये 54 धावांची आक्रमक खेळी केल्याने भारताला न्यूझीलंडविरुद्धची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारता आली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसर्‍या वन-डे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंदूरच्या पाटा खेळपट्टीवर सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्यापासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरुवात केली होती. या दोघांनी 212 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने तब्बल 16 महिन्यांनी शतक साजरे केले. त्याने 85 चेंडूंत 101 धावा केल्या तर गिलने 78 चेंडूंत 112 धावा ठोकून काढल्या. मात्र हे दोघेही शतकानंतर पाठोपाठ बाद झाले.

भारताची सलामी जोडी माघारी गेल्यानंतर भारताची मधली फळी कोलमडली. इशान व विराट यांनी 38 धावांची भागीदारी केली. इशान 17 धावांवर रन आऊट झाला. पाठोपाठ विराट 36 धावांवर बाद झाला. किवी गोलंदाज भारताची एकही जोडी फार काळ टिकू देत नव्हते. सूर्यकुमार यादव (14) व वॉशिंग्टन सुंदर (9) हेही माघारी परतले. बिनबाद 212 वरून भारताची अवस्था 6 बाद 313 अशी झाली.
हार्दिक पंड्या व शार्दूल ठाकूर यांनी टीम इंडियाची लाज वाचवली. या दोघांनी आजच्या सामन्यातील दुसरी सर्वोत्तम भागीदारी नोंदवली. या दोघांनी 34 चेंडूंत 54 धावांची भागीदारी केली. शार्दूल 17 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 25 धावांवर माघारी परतला. हार्दिकने 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताची धावसंख्या चारशेपार नेण्याच्या प्रयत्नात हार्दिक 38 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 54 धावांवर बाद झाला.

संक्षिप्त धावफलक

भारत : 50 षटकांत 9 बाद 385 धावा. (रोहित शर्मा 101, शुभमन गिल 112, हार्दिक पंड्या 54. ब्लेअर टिकनर 3/76.)
न्यूझीलंड : 41.2 षटकांत सर्वबाद 295 धावा. (डेव्होन कॉन्वे 138, हेन्री निकोलस 42. शार्दुल ठाकूर 3/45, कुलदीप यादव 3/62)

Back to top button