

इंदूर, वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) पहिले दोन वन-डे सामने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे इंदूर येथे आज (24 जानेवारी) होणार्या तिसर्या आणि शेवटच्या वन-डेत पाव्हुण्या संघाला क्लीन स्विप करण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज झाली आहे. या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करतील, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
मालिका नावावर केल्यामुळे शेवटच्या सामन्यात भारत आपल्या गोलंदाजीत काही बदल करू शकतो. सलामीवीर शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सामन्यात द्विशतक केले आणि कमी धावसंख्येच्या दुसर्या सामन्यात 40 धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मानेही धडाकेबाज सुरुवात केली असून त्याला आता मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करायचे आहे.
मालिकेत अभेद्य आघाडी मिळवूनही आतापर्यंत फक्त गिल आणि रोहित यांनाच धावा करता आल्या आहेत. इतर फलंदाजांना पुरेशा संधी न मिळाल्याने इशान किशन, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूंना सामन्याच्या परिस्थितीत फलंदाजीचा सराव करण्याची चांगली संधी मिळेल हे देखील वास्तव आहे.
विराट कोहलीला पुन्हा एकदा डावखुर्या फिरकीपटूचा सामना करणे कठीण जात आहे. किवींच्या मिचेल सँटेनरने सलग दोन सामन्यांत विक्रमवीर विराटच्या फलंदाजीतील हवाच काढून घेतली आहे. हैदराबाद येथे 8 आणि रायपूरच्या सामन्यात 11 धावांवर बाद करून सँटेनरने विराटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी चार डावांत तीन शतके झळकावणारा टीम इंडियाचा रनमशिन गेल्या दोन वन-डे मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये स्वस्तात बाद झाल्याने संघाची मधलीफळीचा कमकुवतपणा उघड झाला आहे. यंदाचे वर्ष हे वन-डे विश्वचषक स्पर्धेचे आहे, तेव्हा विराटला फलंदाजीत सुधारणा करावीची लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती पण टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा हा फलंदाज मालिकेतील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. हार्दिकही मधल्या फळीत पुरेसे योगदान देऊ शकलेला नाही. भारताची या आठवड्याच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे इंदोर येथील शेवटच्या वन-डेमध्ये संघ व्यवस्थापन काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. यावेळी देशांतर्गत आपल्या कामगिरीने प्रभावित करणार्या रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
न्यूझीलंडला फलंदाजीत माजी कर्णधार केन विल्यमसनची उणीव भासत आहे. ते शेवटचा वन-डे सामना जिंकून भारताला क्लीनस्वीप करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्नशील असून टी-20 मालिकेपूर्वी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी नक्कीच धडपड करतील.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टिरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, के.एस. भरत (यष्टिरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), फिन एलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, डग ब्रेसवेल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटेनर, इश सोदी, एच शिपले.
स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर
वेळ : दुपारी 1.30 वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क