ICC Women’s T20 Team: आयसीसीकडून महिला टी-20 संघ जाहीर, टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा | पुढारी

ICC Women’s T20 Team: आयसीसीकडून महिला टी-20 संघ जाहीर, टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Women’s T20 Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी 2022 सालचा महिला टी-20 संघ जाहीर केला. या संघात सर्वाधिक चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या तीन आणि न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका महिला खेळाडूला स्थान मिळाले आहे. या संघात निवडलेल्या चार भारतीय खेळाडूंमध्ये स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंग यांचा समावेश आहे.

स्मृती मानधना

भारतीय सुपरस्टार सलामीवीर स्मृती मानधनाने 2022 हे वर्ष आपल्या चमकदार कामगिरीने गाजवले. तिने 21 डावात 33 च्या सरासरीने आणि 133.48 च्या स्ट्राईक रेटने 594 धावा फटकावल्या. या काळात स्मृतीच्या बॅटने 5 अर्धशतकेही झळकावली. यातील एक अर्धशतक तिने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध फटकावले होते. बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तिने दोन अर्धशतके झळकावली, ज्यामुळे भारताला अनुक्रमे पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध हे दोन्ही सामने जिंकण्यात मदत झाली. 2022 मध्ये महिला टी-20 क्रिकेटमध्ये ती चौथी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.

दीप्ती शर्मा

दीप्तीने तिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी 20 संघात स्थान मिळवले. तिने 2022 मध्ये एकूण 29 विकेट घेतल्या आणि गेल्या वर्षी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ती संयुक्तपणे तिसरी होती. या काळात दीप्तीची सरासरी 18.55 होती आणि इकॉनॉमी 6 च्या आसपास राहिली. चेंडूशिवाय तिने बॅटनेही धमाकेदार कामगिरी केली. दिप्तीने 37 च्या सरासरीने आणि 136.02 च्या स्ट्राईक रेटने 370 धावा केल्या. महिला आशिया चषक 2022 मध्ये 13 विकेट्स घेऊन ती प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरली होती.

ऋचा घोष

आयसीसीने भारतीय युवा खेळाडू ऋचा घोष हिला आपल्या 2022 च्या संघात यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. 2022 या वर्षात पाचव्या क्रमाकांनंतर फलंदाजीस मैदानात उतरताना ऋचाचा स्ट्राइक रेट 150 च्या पुढे गेला. 18 सामन्यांमध्ये तिने एकूण 259 धावा केल्या वसूल केल्या. ज्यात 13 जबरदस्त षटकारांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सर्वोत्तम खेळी केली. ज्यात ऋचाने फक्त 19 चेंडूत 40 धावा फटकावून टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले.

रेणुका सिंह

रेणुका सिंह हिने यंदा नवीन चेंडूने स्विंग करून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नाचवले. तिने 2022 मध्ये 23.95 च्या सरासरीने आणि 6.50 च्या इकॉनॉमीने एकूण 22 विकेट घेतल्या. रेणुकाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 7 सामन्यात एकूण 8 बळी पटकावले. राष्ट्रकुल खेळ आणि आशिया चषक स्पर्धेतही तिची कामगिरी उत्कृष्ट होती. तिने 11 सामन्यांत केवळ 5.21 च्या इकॉनॉमीने 17 विकेट घेतल्या. गेल्या वर्षी तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्या सामन्यात रेणुकाने 18 धावांत चार विकेट घेतल्या होत्या. यात तिने 16 डॉट बॉल्स टाकले होते.

आयसीसी महिला टी-20 टीम ऑफ द इयर 2022 :

स्मृती मानधना (भारत), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया), सोफी डेव्हाईन (सी) (न्यूझीलंड), ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), ताहिला मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), निदा दार (पाकिस्तान), दीप्ती शर्मा (भारत), रिचा घोष (भारत), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), इनोका रणवीरा (श्रीलंका), रेणुका सिंग (भारत)

Back to top button