सानिया मिर्झाचा पराभव, महिला दुहेरीतील ग्रँडस्लॅम कारकीर्द संपुष्टात | पुढारी

सानिया मिर्झाचा पराभव, महिला दुहेरीतील ग्रँडस्लॅम कारकीर्द संपुष्टात

पुढारी ऑनलाईन डेस्क : सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार अॅना डॅनिलीना महिला दुहेरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडल्या. इंडो-कझाक जोडीला बेल्जियमच्या अ‍ॅलिसन व्हॅन उइटवांक आणि युक्रेनच्या अॅनहेलिना कॅलिनिना यांच्याकडून 4-6, 6-4, 2-6 असा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियन ओपन ही भारताची महिला टेनिस स्टार सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर ती टेनिसला अलविदा करणार आहे. महिला दुहेरीतील पराभवाने तिची कारकीर्द संपुष्टात आली.

मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या आशा कायम आहेत. यामध्ये भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णा तिचा जोडीदार आहे. अशा स्थितीत सानिया अखेरचे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दोघांच्या जोडीने 2017 फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

सानिया-रोहनची जोडी दुसऱ्या फेरीत

सानिया-रोहन जोडीने शनिवारी मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या जेमी फोरलिस आणि ल्यूक सॅव्हिल यांचा एक तास 14 मिनिटांत 7-5, 6-3 असा पराभव केला. सानियाने तीन महिला दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. तिने महेश भूपतीच्या साथीने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

Back to top button