Shubman Gill : ना रोहित ना विराट… गिलने यशाचे श्रेय दिले ‘या’ दिग्गज खेळाडूला | पुढारी

Shubman Gill : ना रोहित ना विराट... गिलने यशाचे श्रेय दिले ‘या’ दिग्गज खेळाडूला

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडच्या पहिली वन-डे अवघ्या 12 धावांनी जिंकून टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. सामन्याचा हिरो ठरला शुभमन गिल (Shubman Gill). त्याने कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकून कहर केला. गिलची ही खेळी खास होती. कारण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. पण या फलंदाजाने चिकाटी ठेवली आणि धावांचा डोंगर रचूनच तो तंबूत परतला. मात्र गिलने त्याच्या या रेकॉर्ड ब्रेक खेळीचे श्रेय टीम इंडियातील सध्याच्या कोणत्याही सदस्याला न देता माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगला दिले.

गिलचा मोठा खुलासा

विजयानंतर गिल म्हणाला, ‘ही खेळी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात मला मोठी खेळी खेळता आली नाही. पण न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पडझड झाल्यानंतर मोठी धावसंख्या करण्याचे आव्हान होते. मधल्या षटकांत सर्कलमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक असल्याने जलद धावा करण्याचा प्रयत्न केला. इतर संघही अशीच रणनिती वापरतात. मी त्यात यशस्वी झालो. दुसऱ्या टोकाला विकेट पडत असतानाही, मला माझे हेतू गोलंदाजांना स्पष्ट करायचे होते. मी जर तसे केले नसते प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना डॉट बॉल टाकणे सोपे झाले असते.

गिल (Shubman Gill) डावाच्या पहिल्या षटकापासून ते 50 व्या षटकापर्यंत मैदानात नांगर टाकून उभा राहिला. दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळाली नाही. पहिल्या तीन विकेट झटपट पडल्या. मधल्या षटकांमध्ये सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यासोबत दोन अर्धशतकी महत्त्वपूर्ण भागिदा-या रचल्या. याच दरम्यान, गिलने बचावात्मक खेळी न करता किवी गोलंदाजांवर एकामागोमाग आक्रमण चढवले. त्याने चौकार-षटकार मारत धावगती कायम ठेवली. त्याने आपल्या डावातील शेवटच्या दहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले.

विकेट पडल्याने फरक पडला नाही

गिल (Shubman Gill) पुढे म्हणाला, ‘विकेट पडत असतानाही दबाव न घेता खराब चेंडूवर फटका मारायचा हे मी निश्चित केले होते. ही यशाची गुरुकिल्ली आहे. एक फलंदाज म्हणून प्रत्येक फॉरमॅटमध्ये माझा हाच प्रयत्न असतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळते तेव्हा आनंद होतो. युवी पाजी (युवराज सिंग) एका मोठ्या भावाप्रमाणे माझे गुरू आहेत. मी त्याच्याशी माझ्या फलंदाजीबद्दल चर्चा करतो. माझे वडील माझे सुरुवातीचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे सल्ले दिले याचा मला अभिमान आहे.’

युवराजची बॅट घेऊन कसोटी पदार्पण

शुभमन गिलचे (Shubman Gill) कसोटीत पदार्पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले. डिसेंबर 2020 मध्ये मेलबर्न येथे तो सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात गिलने ज्या बॅटने फलंदाजी केली ती युवराज सिंगचीच होती. त्यावर युवराज सिंगच्या युवीकॅन फाउंडेशनचे स्टिकरही होते. गिलने कसोटीच्या पहिल्या डावात 65 चेंडूत 45 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 35 धावांची खेळी करत कांगारूंविरुद्ध त्याच्याच घरात आपली क्षमता सिद्ध केली होती.

प्रदार्पणाची कॅप मिळाली, पण पदरी अपयश

गिलचा काळ कसा बदलला? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या 671 दिवसांच्या संघर्षाबद्दल जाणून घ्यावे लागेल. त्याला 31 जानेवारी 2019 रोजी प्रथमच वन-डे पदार्पणाची कॅप मिळाली. त्या सामन्यात तो फक्त 9 धावा करून बाद झाला. यानंतर या खेळाडूने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ 7 धावा केल्या. गिलला 2 डिसेंबर 2020 रोजी तिसरा एकदिवसीय सामना खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 33 धावा करून तो बाद झाला.गिलला 671 दिवसांत केवळ 3 वनडे खेळायला मिळाले आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

कोरोनाच्या काळात गिलने युवराजसोबत मेहनत

2020 मध्ये जेव्हा देश आणि जग कोरोनाशी लढत होते, तेव्हा शुभमन गिल आपली फलंदाजी सुधारण्यात गुंतला होता. गिलने माजी क्रिकेटपटू आणि भारताचा विश्वचषक विजेता खेळाडू युवराज सिंगसोबत स्वत:च्या फलंदाजीवर काम केले. युवीने गिलच्या कौशल्यात भर घातली. या सर्व घडामोडीनंतर युवराजने एक मोठी भविष्यवाणी केली. तो म्हणाला की, येत्या 10 वर्षांत शुभमन गिल यशाच्या शिखरावर असेल आणि जग त्याला सलाम करेल, असा विश्वास व्यक्त केला.

युवीचे ते विधान खरे ठरत आहे. गिलने वनडे फॉरमॅटमध्ये कमाल केली आहे. या खेळाडूला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघात संधी मिळाली आणि त्यानंतर गिलने मागे वळून पाहिले नाही. त्याने पहिले एकदिवसीय अर्धशतक 22 जुलै 2022 रोजी झळकाले. त्यानंतर त्याने मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 98 धावांची खेळी केली. या मालिकेत गिलला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले.

Back to top button