WFI : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी लैंगिक शोषण केल्याचा माहिला कुस्तीपटूंचा आरोप | पुढारी

WFI : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी लैंगिक शोषण केल्याचा माहिला कुस्तीपटूंचा आरोप

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍याभारतीय कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाच्या (WFI) मनमानीविरोधात आवाज उठवला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर बुधवारी निदर्शने सुरू केली आहेत.

हे खेळाडू राष्ट्रीय महासंघाच्या मनमानी नियमांना विरोध करत आहेत. महासंघ त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. देशासाठी पदक जिंकूनही त्यांना पद्धतशीरपणे डावलले जात आहे.

WFI : हे आहे वादाचे कारण

कुस्ती महासंघाने विशाखापट्टणम येथील वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी नव्या पंचांची नियुक्ती केली होती. तथापि, नवीन पंचांना नियम माहीत नव्हते. त्यांनी चुकीचे निर्णय दिले. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड असंतोष असून यावर वादही झाला. बजरंग पुनियाचे वैयक्तिक प्रशिक्षक सुजित मान यांना एका सामन्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिणामी महासंघाने त्यांना निलंबित केले. सोनीपत येथील वरिष्ठ शिबिरात मान यांना स्थान देण्यात आलेले नाही. महासंघाच्या अशा मनमानीमुळे कुस्तीगिरांनी निदर्शने सुरू केली आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ते खासदार असून त्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला आव्हान दिले होते. तेव्हाही ते चर्चेत होते. विनेश फोगाट म्हणाली, ‘अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षक राष्ट्रीय शिबिरांमध्ये महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करतात. अनेक महिला कुस्तीपटूंनीही याबाबत तक्रारी केल्या आहेत.

…तर मला फाशी द्या : बृजभूषण शरण सिंह

जर माझ्यावरील आरोप खरे ठरले तर मला भर चौकात फाशी द्या, अशा शब्दांत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे.

Back to top button