INDvsNZ 1st ODI : न्यूझीलंडने टीम इंडियाला झुंजवले, रोहित ब्रिगेडचा रोमांचक विजय | पुढारी

INDvsNZ 1st ODI : न्यूझीलंडने टीम इंडियाला झुंजवले, रोहित ब्रिगेडचा रोमांचक विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. बुधवारी (18 जानेवारी) हैदराबाद येथे विजय मिळवून त्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या. गिलने 208 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 49.2 षटकांत 337 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावांची धडाकेबाज खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

एका वेळी 131 धावांवर सहा विकेट गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संघर्ष करत होता. टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण येथून मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनरने डाव सांभाळला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 102 चेंडूत 162 धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजने 46 व्या षटकात दोन विकेट घेत भारताला पुढे केले. सँटनर 45 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावा करायच्या होत्या. शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेसवेलने षटकार ठोकला. त्यानंतरचा चेंडू वाईड टाकला. पण पुढच्याच चेंडूवर त्याने ब्रेसवेलला एलबीडब्ल्यू केले. किवी फलंदाजाने डीआरएस घेतला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय काय ठेवला. याबरोबर टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 10 षटकार मारले.

तत्पूर्वी, शुबमन गिलने फटाकावलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या न्यूझीलंडसमोर पहिल्या वन-डेमध्ये विजयासाठी 350 धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादमध्ये खेळलेल्या या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत आठ विकेट गमावत 349 धावांचा डोंगर रचला. शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावांची खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. शुभमनशिवाय रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादवने 31, हार्दिक पांड्याने 28 आणि वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा केल्या. विराट कोहली आठ आणि इशान किशन पाच धावा करून बाद झाला.

सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात करत 60 धावांची भागिदारी केली. 12.1 व्या षटकांत भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा (34) बाद झाला. ब्लेअर टिकनरने त्याला मिचेल सँटनरकरवी झेलबाद केले. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने निराशा केली. तो 8 धावा करून माघारी परतला. त्याला सँटनरने 15.2 व्या षटकात क्लिन बोल्ड केले. यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 88 होती. 19.4 व्या षटकात टीम इंडियाला इशान किशनच्या रुपात धक्का बसला. लॉकी फर्ग्युसनने किवी संघाला तिसरे यश मिळवून दिले. इशान 14 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. यावेळी भारताची धावसंख्या 110 होती. शुबमन आणि इशानमध्ये 22 धावांची भागिदारी झाली.

तीन विकेट झटपट पडल्यानंतर शुबमन गिलने सूर्यकुमारच्या साथीने डाव सांभाळला. दोघांनी 65 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. 28.3 व्या षटकात मिचेलने ही जमलेली जोडी फोडली. त्याने सूर्यकुमारला सँटनर करवी झेलबाद केले. सूर्याने चार चौकारांच्या मदतीने 26 चेंडूत 31 धावांची खेळी केली. यावेळी भारताची धावसंख्या 4 बाद 175 होती. यानंतरच्या पुढच्याच षटकात शुबमन गिलने वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने सलग दुसऱ्या डावात शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही शतक फटकावले होते. गिलने 87 चेंडूत 14 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 100 धावा पूर्ण केल्या. त्याचे हे अवघ्या 19 डावात वनडेतील तिसरे शतक ठरले. भारताकडून फक्त शिखर धवनला कमी डावात तीन शतके झळकावता आली आहेत. धवनने 17 डावात तीन शतक झळकावले होते.

शुबमन गिलने 32 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार टिकनरला चौकार लगावत वनडे कारकिर्दीतील 1000 धावा पूर्ण केल्या.

शुबमन गिल आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी (74 धावा) भागीदारी केली. 39.4 व्या षटकात मिचेलने टीम इंडियाला पाचवा झटका देत ही जोडी फोडली. त्याने हार्दिक पंड्याला (38 चेंडूत 28 धावा) क्लिन बोल्ड केले. यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 249 होती.

वॉशिंग्टन सुंदर 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 45 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला हेन्री शिपलीने सुंदरला एलबीडब्ल्यू केले. यावेळी भारताची धावसंख्या 45 षटकांत 6 बाद 292 धावा होती.

शुभमन गिलचे द्विशतक

शुभमन गिलने 19व्या वनडे डावात द्विशतक झळकावले. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारून त्याने 200 धावांचा टप्पा गाठला. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आहे.

इशानला संधी

आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताला तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे. रोहित शर्माच्या संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली तर ते अव्वल स्थानावर झेप घेतील. दरम्यान, किवींविरुद्धच्या या मालिकेत केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत असेल. ऋषभ पंतचा कार अपघात, तर वैयक्तीक कारणांमुळे राहुलची अनुपस्थिती यामुळे ईशान किशन हा न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे आणि टी-20 साठी विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदार मानला जात होता. झालेही तसेच पहिल्या वन-डेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये इशानला संधी मिळाली आहे.

IND vs NZ ODI 1st ODI : वॉशिंग्टन सुंदरला संधी

रवींद्र जडेजाचा फिटनेस आणि अक्षर पटेलचा ब्रेक यामुळे ऑफ-स्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला आजच्‍या सामन्‍यात खेळण्‍याची संधी मिळाली आहे. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून दुखापतींमुळे वॉशिंग्टन सुंदर त्रस्त होते. परिणामी त्याला किमान दोन विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. आयपीएल 2022 पासून, त्याने त्याच्या पॉवर हिटिंगवर काम केले आहे. त्याचे कल्पक फटके गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पाहायला मिळाले होते. वॉशिंग्टनने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून खेळताना फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली. स्वत: ला एक चांगला फिरकीपटू आणि फिनिशर बनवण्यासाठी तो काम करत आहे.

शार्दुल ठाकूरचे पुनरागमन

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शार्दुल ठाकूर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्‍या वनडे सामन्‍यात संधी मिळाली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. दीपक चहर जखमी आणि भुवनेश्वर कुमार निवड समितीच्या नजरेतून बाहेर असल्याने शार्दुलला आणखी एक संधी देण्यात आली आहे. तो चहरसारखा स्विंग गोलंदाज नसला तरी तो नव्या चेंडूने उपयुक्त मारा करू शकतो. तसेच तो बॅटनेही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने चेन्नईत न्यूझीलंड अ विरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना 33 चेंडूत 51 धावा फटकावून महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम ( यष्‍टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

Back to top button