

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेफाली वर्माच्या (Shafali Verma) नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने 2023 च्या अंडर-19 टी 20 विश्वचषकात विजयी सलामी दिली. द. आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत वर्चस्व गाजवले. या सामन्यात श्वेता सेहरावतने भारतासाठी सर्वाधिक 92 धावांची नाबाद खेळी साकारली. यादरम्यान कर्णधार शेफाली वर्माने हिने आपल्या वादळी खेळीने चाहत्यांचे मनोरंजन केले. शेफालीने द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 281.25 च्या स्ट्राइक रेटने 16 चेंडूत 45 धावा ठोकल्या. तिने आपल्या खेळीत एकूण 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. यादरम्यान शेफालीने एका षटकात 5 चौकार आणि 1 षटकार मारत एकूण 26 धावा वसूल केल्या.
5 षटकांनंतर भारताची धावसंख्या 44 होती. पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकणासाठी नथाबिसेंग निनीच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. स्टाईकवर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा (Shafali Verma) होती. तिने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूपासून जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आणि लागोपाठ 5 चौकार लगावले. तर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर पॉवरप्ले संपल्यानंतर संघाची धावसंख्या थेट 70 पर्यंत पोहचली. दरम्यान, शेफालीच्या त्या आक्रमक फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
द. आफ्रिकेच्या अंडर-19 महिला संघाची कर्णधार ओलुहले सिओ हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 166 धावा केल्या. सायमन लॉरेन्सने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याचवेळी मॅडिसन लँडसमॅनने 32 धावा केल्या. अॅलेन्ड्री रेन्सबर्गने 23 धावा केल्या. भारताकडून शेफाली वर्माने (Shafali Verma) 2, तर शबनम आणि पार्श्वी चोप्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.
167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शेफाली वर्मासह श्वेता सेहरावतने संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. श्वेताने आपल्या खेळीत 20 चौकार मारले आणि तिला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. भारताचा पुढील सामना 16 जानेवारीला युएई विरुद्ध खेळवला जाणार आहे.