Hockey World Cup : भारताचा स्पेनला दणका, 2-0 पराभव करत पहिला सामना जिंकला | पुढारी

Hockey World Cup : भारताचा स्पेनला दणका, 2-0 पराभव करत पहिला सामना जिंकला

पुढारी ऑनलाईन डेस्क : एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने स्पेनचा 2-0 असा पराभव केला. भारताकडून अमित रोहितदासने 12 व्या आणि हार्दिक सिंगने 27 व्या मिनिटाला गोल केले. या विजयासह टीम इंडियाने ग्रुप डी मध्ये दुसरे स्थान मिळवले.

भारताने सामन्यात संथ सुरुवात केली. पहिली पाच मिनिटे स्पेनने टीम इंडियाला घाम फोडला. पहिल्या क्वार्टरमध्ये स्पेनचे वर्चस्व होते पण भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने एकही गोल होऊ दिला नाही. श्रीजेशने शानदार सेव्ह करत टीम इंडियाला पुढे नेले. टीम इंडियाला 11व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतला त्याचे रुपांतर करता आले नाही. यानंतर 13व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा अमित रोहिदासने पुरेपूर फायदा घेतला. अमितने शानदार ड्रॅग फ्लिकसह भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

26व्या मिनिटाला दुसरा गोल

यानंतर हाफ टाईमपर्यंत टीम इंडियाने पूर्ण वर्चस्व राखले. भारताला 26 व्या मिनिटाला दुसरी संधी मिळाली. हार्दिक सिंगने चार खेळाडूंना चकवा देत स्पॅनिश गोलजाळे भेदले. या जबरदस्त गोलच्या जोरावर भारताने आपली आघाडी हाप टाईमपूर्वीच दुप्पट केली. या विश्वचषकात भारताचा हा पहिला मैदानी गोल ठरला. या गोलसह भारताने हॉकी इतिहासात 200 गोलचा टप्पा गाठला.

कर्णधार हरमनप्रीत सिंगचा पेनल्टी स्ट्रोक चुकला

सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. स्पेनच्या खेळाडूंच्या चुकीमुळे 32 व्या मिनिटाला टीम इंडियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर गोलची होण्याची चाहत्यांना अपेक्षा होती. पण कर्णधार हरमनप्रीत सिंगने मारलेला स्ट्रोक स्पॅनिश गोलकीपरने तटवून टीम इंडियाला आघाडी तिप्पट करण्यापासून रोखले.

भारताला 37व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. कर्णधार आणि पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंग मैदानावर नव्हता. अशा स्थितीत इतर खेळाडूंसमोर चेंडू गोलपोस्टमध्ये टाकण्याचे आव्हान होते. पण त्यात भारतीय संघाला यश आले नाही. यानंतर 43 व्या मिनिटालाही भारताने पेनल्टी कॉर्नरही वाया घालवला.

भारताचे 200 गोल

अमित रोहदासने दुसरा गोल करताच टीम इंडियाने इतिहास रचला. भारतीय संघाने हॉकी वर्ल्ड कपमध्ये आपले 200 गोल पूर्ण केले. या 200 गोलांसह टीम इंडिया हॉकी वर्ल्ड कपमध्ये जगातील तिसरा सर्वाधिक गोल करणारा संघ बनला आहे. जगातील फक्त तीन संघांना 200 हून अधिक गोल करता आले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक गोल

हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. शुक्रवारीच झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा पराभव करून खळबळ उडवून दिली. या 8 गोलांसह ऑस्ट्रेलियाने हॉकी वर्ल्ड कपमध्ये 313 गोल केले आहेत. दुसरीकडे गोलच्या बाबतीत नेदरलँड दुसऱ्या स्थानावर आहे. हॉकी विश्वचषकात नेदरलँड्सने 267 गोल नोंदवले आहेत. तर भारत तिसऱ्या आणि स्पेन चौथ्या क्रमांकावर आहे. स्पेनने आतापर्यंत 176 गोल केले आहेत. फ्रान्स हा सर्वात कमी गोल (21) करणारा संघ आहे. फ्रान्सने केवळ 21 गोल ​​केले आहेत.

भारताला ग्रुपमध्ये पहिले स्थान मिळवावेच लागेल

ग्रुप डी मधील प्रथम क्रमांकाचा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहे. तर दुस-या, तिस-या स्थानावरील संघ क्रॉसओव्हर फेरीत ग्रुप सी मधील अनुक्रमे तिस-या आणि दुस-या स्थानावरील संघांशी भिडतील.

Back to top button