

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या आयसीसी टी 20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. सूर्याने आता या क्रमवारीत 900 रेटींगचा टप्पा ओलांडला असून जगातील फक्त दोनच फलंदाजांना हे रेटिंग मिळाले आहे. पण श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी का मिळाली नाही, असा सवाल केला जात आहे.
सूर्याने (Suryakumar Yadav) टी-20 संघातील आपले स्थान निश्चित केले आहे, परंतु तो अद्याप वनडेतील स्थान पक्के करू शकलेला नाही. त्याला वनडेत कधी संधी मिळेल याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. टीम इंडियाने वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला तेव्हाही सूर्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. तर सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो संघाचा भाग आहे पण दोन सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला डच्चू देण्यात आला आहे. वास्तविक, बीसीसीआय भारताचे दोन संघ तयार करण्याचा विचार करत आहे. एक संघ या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार असून दुसरा संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी खेळणार आहे. यातून दोन्ही फॉरमॅट खेळणारे मोजकेच खेळाडू असतील. अशा परिस्थितीत, श्रेयस अय्यर आता टी-20 संघातून बाहेर पडल्याची शक्यता चित्र निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, टी-20 संघात असूनही वनडे संघात स्थान मिळू शकलेले नाही. केएल राहुल किंवा श्रेयस अय्यरपैकी कोणीही जखमी झाले किंवा संघाबाहेर गेले तरच सूर्याची एन्ट्री टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सूर्यकुमारने वनडेत चांगलेच प्रदर्शन केले आहे. त्याने आतापर्यंत 16 एकदिवसीय सामने खेळले असून त्याच्या नावावर 384 धावा असून त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली आहेत. 50-50 षटकांच्या सामन्यात सूर्याची सरासरी 32 आहे, तर त्याने 100 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. सूर्याची सर्वोच्च धावसंख्या 64 आहे. पण त्याला आणखी काही संधी देण्याची गरज आहे. अगामी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
सूर्यकुमारचे वनडे क्रिकेटचे पदार्पण नेत्रदीपक ठरले होते. आठ डावांनंतर त्याची सरासरी 53.40 आणि त्याचा स्ट्राइक रेट 103.08 होता. मात्र, पुढील आठ डावांत तो चार वेळा 10 पेक्षा कमी आणि दोनदा 20 पेक्षा कमी धावांवर बाद झाला. परंतु हे विश्वचषक स्पर्धेचे वर्ष आहे आणि भारताकडे मध्यम क्रमवारीत कमी जागा आणि बरेच दावेदार आहेत. गेल्या दोन वर्षांत 4 ते 6 क्रमांकाच्या दरम्यान किमान पाच डाव खेळणाऱ्या जवळपास प्रत्येकाने चांगली कामगिरी केली आहे. या सर्वांमध्ये सूर्यकुमारचे आकडे उत्साहवर्धक नसल्याचे मत संघ व्यवस्थापनाचे आहेत, अशी चर्चा सुरू आहे. पण त्याचा टी 20 क्रिकेटमधील फॉर्म लक्षात घेता वनडेमध्ये त्याला अधिक संधी देणे गरजेचे आहे, असे माजी खेळाडूंचे म्हणणे आहे.