Kuldeep Yadav Record : कुलदीप यादवचे ‘दुहेरी शतक’! इडन गार्डन्स मैदानावर रचला इतिहास | पुढारी

Kuldeep Yadav Record : कुलदीप यादवचे 'दुहेरी शतक'! इडन गार्डन्स मैदानावर रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kuldeep Yadav Record : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव उत्कृष्ट लयीत दिसला. या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला. या संधीचे सोने करत कुलदीपने या सामन्यात 5.10 च्या इकोनॉमीने 10 षटकात 51 धावा देत 3 बळी घेतले. तिसरी विकेट घेताच त्याने 200 आंतरराष्ट्रीय बळींचा आकडा गाठला. याचबरोबर तो टीम इंडियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो 23वा भारतीय गोलंदाज बनला.

इडन गार्डन्स मैदानावरील सामन्यात कुलदीपने यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिस (34), चारिथ असालंका (15) आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (2) यांची शिकार केली. गुवाहाटीच्या सामन्यात शतक झळकावणा-या दासुन शनाकाचा तर त्रिफळा उडवून त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

कुलदीप टीम इंडियात नियमित स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला आहे. पण जेव्हा-जेव्हा त्याल्या संधी मिळेते तेव्हा तो त्याचा फायदा उठवण्यात पटाईत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या वनडेत त्याला चहलच्या ऐवजी संघात स्थान मिळाले. त्यानेही आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवत पटापट विकेट्स मिळवून धुमाकूळ घातला. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 200 बळी पूर्ण केले. त्याने 107 सामन्यांच्या 110 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे.

कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटच्या 72 डावांमध्ये सर्वाधिक 122 विकेट घेतल्या आहेत. यात त्याच्या नावावर दोनदा हॅट्ट्रिकची नोंद आहे. त्याचबरोबर कुलदीपला जेव्हा-जेव्हा कसोटी आणि टी-20 मध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने विकेट्स घेतल्या. कुलदीपने कसोटीतील 14 डावांत 34 आणि टी-20 च्या 24 डावांत 44 फलंदाजांची शिकार केली आहे. (Kuldeep Yadav Record)

कुलदीपने 25 मार्च 2017 रोजी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी, पुढील काही महिन्यांत, त्याने पर्यायाने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पदार्पण केले. (Kuldeep Yadav Record)

कुलदीप यादवशिवाय मोहम्मद सिराजने 5.4 षटकात 30 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 7 षटकांत 48 धावा देत 2 बळी घेतले. त्याचवेळी अक्षर पटेलही एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

Back to top button