

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीम इंडियातून वगळण्यात आलेला सलामीवीर पृथ्वी शॉने द्विशतक झळकावून निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीने आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात 235 चेंडूंत द्विशतक झळकावले. हे त्याच्या रणजी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक आहे. 23 वर्षीय पृथ्वी शॉ याने 283 चेंडूंत 240 धावा केल्या. या दरम्यान त्याने 33 चौकार आणि 1 षटकार लगावला. उपाहारापूर्वी त्याने 107 चेंडूंत शतक पूर्ण केले होते.
आसाम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळाले होते. ज्यामध्ये मुंबई संघाकडून पृथ्वी शॉ याने सर्वाधिक नाबाद 240 धावा केल्या. त्यामुळे मुंबई संघ 90 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 397 धावा करू शकला. आसाम संघाकडून मुख्तार हुसेनने एक विकेट घेतली.
पृथ्वीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द :
पृथ्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, 2018 मध्ये पदार्पण करणार्या या खेळाडूने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये 339 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या नावावर 6 वन-डेत 189 धावा आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 49 धावा आहे. पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर आहे.