अभिजीत कटके ठरला ‘हिंदकेसरी’चा मानकरी | पुढारी

अभिजीत कटके ठरला 'हिंदकेसरी'चा मानकरी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाने ५ ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित केली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोमवीर विरुद्ध अभिजीत कटके यांचा सामना झाला. यामध्ये कटके याने 5 – 0 ने सोमवीर याचा पराभव करून हिंद केसरी किताब पटकावला आहे.

अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतचे वजन या घडीला तब्बल १२२ किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अभिजीतने २०१५ साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. २०१६ साली त्याने ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचे दिसून येत आहे. २०१७ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके यांनी स्पर्धा जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता. तसेच, त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मिळाले होते. आता त्याने हिंद केसरी हा किताब देखील पटकावला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button