RCBvsCSK : सीएसके सेफ झोनमध्ये, आरसीबीचा केला ६ विकेट्सनी पराभव | पुढारी

RCBvsCSK : सीएसके सेफ झोनमध्ये, आरसीबीचा केला ६ विकेट्सनी पराभव

शारजाह : पुढारी ऑनलाईन

आजच्या आरसीबी विरुद्ध सीएसके ( RCBvsCSK ) सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा ६ विकेट्सनी पराभव केला. त्यामुळे सीएसके आता १४ गुण मिळवून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचली आहे. आरसीबीने सीएसके समोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. आरसीबीकडून देवदत्त पडिक्कल ( ७० ) आणि विराट कोहलीने ( ५३ ) दमदार सलामी दिली. मात्र त्यानंतर त्यांचा डाव ढासळला.

सीएसकेने हे १५७ धावांचे आव्हान १९ व्या षटकात पार केले. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ३८ धावा केल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने २ तर चहल आणि मॅक्सवेलने प्रत्येकी १ विकेट घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंबाती रायडूने ( ३२ )  डाव सावरत सीएसकेला विजयाच्या जवळ पोहचवले. अखेर धोनी आणि रैनाच्या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

आरसीबीच्या १५७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सीएसकेच्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी ७१ धावांची सलामी दिली. पण, यझुवेंद्र चहलने २६ चेंडूत ३८ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या गायकवाडला बाद करुन ही जोडी फोडली.

त्यानंतर पुढच्याच षटकात मॅक्सवेलनेही सेट झालेल्या फाफ ड्युप्लेसिसला ३१ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे सीएसकेची अवस्था बिनबाद ७१ वरुन २ बाद ७१ अशी झाली. पाठोपाठ पडलेल्या विकेटनंतर मोईन अली आणि अंबाती रायडुने डाव सावरण्याचा प्रयत्ने केला. या दोघांनी सीएसकेला शतक पार करुन दिले.

ही जोडी आरसीबीसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच हर्षल पटेलने मोईन अलीला २३ धावांवर बाद केले. मोईन अली बाद झाल्यानंतर रायडूने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत सीएसकेची धावगती वाढावण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तो पटेलच्या गोलंदाजीवर ३२ धावांवर बाद झाला.

रायडू बाद झाला त्यावेळी सीएसकेला २६ चेंडूत २४ धावांची गरज होती. मैदानावर रैना – धोनी ही कसलेली जोडी होती. रैनाने १७ व्या षटकात हसरंगाला ११ धावा चोपून सामना आवाक्यात आणला. अखेर सीएसकेने आरसीबीचे १५७ धावांचे आव्हान १९ व्या षटकात पार केले. रैना १० चेंडूत नाबाद १७ तर धोनीने ९ चेंडूत नाबाद ११ धावा केल्या.

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये आज रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज ( RCBvsCSK ) यांच्यातील सामना सुरु होण्यापूर्वीच वादळ आल्याने सामना सुरु होण्यास उशीर झाला. हे वादळ शमल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताणाऱ्या आरसीबीने धडाक्यात सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने आक्रमक फटके मारले. त्याला देवदत्त पडिक्कलने त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी संघाला पॉवर प्लेमध्ये ५५ धावांपर्यंत पोहचवले. यात विराटचा ३३ धावांचा वाटा होता.

पॉवर प्लेनंतर पडिक्कलची पॉवर ( RCBvsCSK )

पॉवर प्लेनंतर पडिक्कलने देखील आपला गिअर बदलला. त्याने विराटच्या आधीच आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघा सलामीवीरांनी १२ व्या षटकात आरसीबीचे शतक धावफलकावर लावले. त्यानंतर विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले.  मात्र ब्रोव्होने विराट कोहलीला जडेजाकरवी ५३ धावांवर बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला.

विराट कोहली बाद झाल्यानंतर पडिक्कलने धावांची गती वाढवली. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या एबी डिव्हिलियर्सनेही अखेरच्या पाच षटकात आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र शार्दुल ठाकूरने त्याला १२ धावांवर बाद करत आरसीबीला मोक्याच्या क्षणी मोठा धक्का दिला.

त्यानंतर शार्दुलने पुन्हा एकदा आरसीबीला जबरदस्त धक्का देत ७० धावा करणाऱ्या पडिक्कलला माघारी धाडले. त्यामुळे अखेरची ३ षटकेच शिल्लक असतानाच आरसीबीचे दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाले. यानंतर आरसीबीची धावगती थोडी मंदावली. अखेर मॅक्सवेलने षटकार मारत संघाला १५० धावांपर्यंत पोहचवले.

मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडण्याचा सिलसिला सुरुच राहिला. टीम डेव्हिड अवघ्या १ धावेची भर घालून बाद झाला. त्यानंतर लगेचच मॅक्सेवलही ११ धावा करुन बाद झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर हर्षलही ३ धावा करुन बाद झाला. त्यामुळे आरसीबीला २० षटकात ६ बाद १५६ धावाच करता आल्या. चेन्नईकडून ब्राव्होने २४ धावात ३ तर शार्दुल ठाकूरने २९ धावात २ विकेट घेतल्या.

Back to top button