RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्ससमोर ‘सुपर’ आव्हान
शारजाह; वृत्तसंस्था : RCB vs CSK : स्टार खेळाडूंनी सजलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला गेल्या लढतीत निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाला मागे सारत शुक्रवारी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध (RCB vs CSK) चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. चेन्नई सुपर किंग्ज संघाने रविवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असणार आहे.
आरसीबीला गुणतालिकेत अव्वल चार संघांत आपले स्थान कायम ठेवायचे झाल्यास त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. संघाला सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार विराट कोहली या जोडीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा चुरशीचे सामने पाहायला मिळतात.
आरसीबीच्या मध्यक्रमाने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. कारण, गेल्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही. ग्लेन मॅक्सवेल आणि ए. बी. डिव्हिलीयर्स यांनादेखील चमक दाखवावी लागेल. गेल्या लढतीत मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, काईल जेमिन्सन, लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू हसरंगा या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती.
दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने मुंबईविरुद्ध युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या 58 चेंडूंत 88 धावांच्या खेळीच्या जोरावर पुनरागमन करीत विजय मिळवला. या लढतीत फाफ-डू-प्लेसिस आणि मोईन अली यांना खातेदेखील उघडता आले नाही. तर, अंबाती रायडू हा 'रिटायर्ड हर्ट' झाला. अनुभवी सुरेश रैना आणि धोनीलादेखील धावा करता आल्या नाहीत. मात्र, गायकवाडने रवींद्र जडेजा व ड्वेन ब्राव्होसोबत संघाला 6 बाद 156 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. यानंतर दीपक चहर आणि ब्राव्होने गोलंदाजीत छाप पाडली.
संघ यातून निवडणार
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, इम्रान ताहिर, फाफ-डू-प्लेसिस, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, जोश हेझलवूड, जेसन बेहरेनडॉर्फ, कृष्णप्पा गौतम, मिचेल सँटनेर, रवी श्रीनिवासन साई किशोर, हरि निशांत, एन. जगदीशन, चेतेश्वर पुजारा, के. एम. आसिफ, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टियन, रजत पाटीदार, दुष्मंथा चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी, वानिंडू हसरंगा, जॉर्ज गार्टन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काईल जेमिन्सन, सुयश प्रभूदेसाई, के. एस. भरत, टीम डेव्हिड, आकाश दीप, ए. बी. डिव्हिलीयर्स.
धोनीच सरस
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या (RCB VS KKR) आयपीएलमधील कामगिरीकडे लक्ष टाकल्यास दोन्ही संघ 27 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये बंगळूर संघाची कामगिरी निराशजनक राहिली आहे. बंगळूरने केवळ 9 सामने जिंकले असून, चेन्नईने 17 सामन्यांत बाजी मारली आहे. संघाचे अपयश कमी करण्यावर विराटसेनेचे आता लक्ष्य असेल.

