

ऑस्ट्रेलियातील युनायटेड कप टेनिस स्पर्धेत (United Cup tennis) आज जर्मनी संघ झेक संघाविरुद्ध तीनही सामने हारून पिछाडीवर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रा क्विटोवाने एकेरीचे दोन्ही सामने जिंकल्याने झेक संघाला जर्मनी विरुद्ध 3-0 अशी आघाडी प्राप्त झाली. आज तिने लॉरा सिगेमंड हिचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-2 असा धुव्वा उडविला.
अन्य महत्त्वाच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 3 असलेल्या नॉर्वेच्या कॅस्पर रूडने ब्राझीलच्या थिएगो मॉन्टीएरोचा 1 तास 10 मिनिटांत 6-3, 6-2 असा फडशा पाडला. (United Cup tennis)
नदालसारखा बलाढ्य खेळाडू संघात असूनही स्पेनला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत पराभव चाखावा लागला. मात्र, पॉला बडोसाने आज स्पेनसाठी पहिला विजय नोंदविला; परंतु इंग्लंडच्या हेरिएट डार्टला नमविताना तिला 6-7, 7-6, 6-1 असे झगडावे लागले. स्पर्धेची चुरस दुसर्या टप्प्यात पोहोचली असून आता दिग्गज आणि महान खेळाडूंमध्ये अटीतटीचे सामने आणि बहारदार टेनिस पाहायला मिळणार हे उघड आहे.