Pele Gate : कोलकातामध्ये ‘मोहन बागान’ क्लब उभारणार ‘पेले गेट’! | पुढारी

Pele Gate : कोलकातामध्ये ‘मोहन बागान’ क्लब उभारणार ‘पेले गेट’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pele Gate : 45 वर्षांपूर्वी कोलकाता येथे फुटबॉल सामना खेळलेल्या दिवंगत पेले (Pele) यांना मोहन बागान क्लबने (Mohan Bagan) अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. संघाचा झेंडा अर्ध्यावर खाली ठेवून क्लबमध्ये लवकरच ‘पेले गेट’ उभारले जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच याचे काम सुरू होईल आणि ते सर्वसामान्यांसाठी खुले करू, अशी माहिती ‘मोहन बागान’चे सचिव देवाशिष दत्ता यांनी दिली आहे.

फुटबॉल सम्राट पेले यांचे गुरुवारी (29 डिसेंबर) 82 व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी झुंज देताना त्यांनी ब्राझीलमधील साओ पाउलो येथे रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

25 सप्टेंबर 1977 हा दिवस भारतीय फुटबॉलच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. याच दिवशी पेले यांनी कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर सामना खेळून भारतीयांची मने जिंकली होती. स्थानिक क्लब मोहन बागान विरुद्ध झालेल्या त्या ऐतिहासिक सामन्यात पेले यांनी न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे 45 वर्षांपूर्वीची ती ऐतिहासिक आठवण पेले यांच्या निधनानंतर जपून ठेवण्यासाठी मोहन बागानने पुढाकार घेतला आहे. क्लबमध्ये ‘पेले गेट’ (Pele Gate) उभारले जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

क्लबचे सचिव दत्ता म्हणाले की, पेले यांनी जगाचा निरोप घेणे हा मोहन बागानसाठी हा काळा दिवस होता. कारण मोहन बागान हा भारतातील एकमेव क्लब आहे ज्याच्या विरुद्ध तीन विश्वचषक विजेते पेले यांनी प्रदर्शनीय सामन्यात सहभाग नोंदवला. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, मोहन बागान 2-1 ने आघाडीवर होता. तो सामना भारतीय क्लब जिंकण्याच्या स्थितीत पोहचला असतानाच ‘कॉसमॉस’ला शेवटच्या क्षणी पेनल्टी बहाल करण्यात आली, ज्यामुळे त्यांना सामना अनिर्णित ठेवण्यात यश आले. (Pele Gate)

Back to top button