PAK vs NZ Test Draw : पाकिस्तानला शेपटाने तारले, किवींविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित

PAK vs NZ Test Draw : पाकिस्तानला शेपटाने तारले, किवींविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAK vs NZ 1st Test Match : मागील पाच कसोटी सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने अखेर आपली पराभवाची मालिका खंडीत केली. शुक्रवारी बाबरच्या संघाला न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात यश आले. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाकिस्तानने आपला दुसरा डाव 8 बाद 311 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले. विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या किवी संघाने झटपट धावा केल्या. मात्र कमी षटके वाट्याला आल्यामुळे न्यूझीलंडला केवळ 7.3 षटकांत 1 बाद 61 धावांपर्यंतच मजल मारता आली.

तत्पूर्वी, कसोटीच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानने कालच्या 2 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पाक फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. खेळ सुरू होऊन काही मिनिटे होताच नौमन अली (4) आणि बाबर आझम (14) हे भरवशाचे फलंदाज बाद झाले. ब्रेसवेलने नौमनला आणि इश सोढीने बाबरला माघारी धाडले. 100 धावांवर 4 फलंदाज बाद झाल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर सलामीवीर इमाम उल हक आणि सर्फराज अहमद यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. दोघांनी संयमी खेळी करून धावफलक हलता ठेवला. या दरम्यान त्यांनी अर्धशतकी भागिदारी रचली आणि लंच ब्रेकपर्यंत संघाची धावसंख्या 62 षटकांत 4 बाद 181 पर्यंत पोहचवली.

सोढीच्या अर्धा डझन विकेट

लंच ब्रेकनंतर न्यूझीलंडने सामन्यात पुनरागमन केले. इश सोढीने तीन विकेट घेवून पाकिस्तानला बॅकफुटवर ढकलले. त्याने 63.3 व्या षटकात सर्फराज (53), 69.1 व्या षटकात आगा सलमान (6) आणि 71.5 व्या षटकात इमाम उल हक (96) यांना तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी पाकची अवस्था 7 बाद 206 होती. तसेच सामना संपायला दोन तास शिल्लक असताना त्यांच्या खात्यात 32 धावांची आघाडी जमा झाली होती. त्यामुळे शेवटच्या तीन विकेट घेऊन किवी सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरेल असा अंदाज अनेकांनी बांधला. पण सौद शकील आणि मोहम्मद वसीम जूनियर हे पाकिस्तानसाठी संकटमोचक ठरले. दोघांनी आठव्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी करून संघाच्या आघाडीत भर घातली. सोढीने मोहम्मद वासीमला (43) बाद करून ही जोडी फोडली. याचबरोबर किवींच्या या गोलंदाजाने दुस-या डावात अर्धा डझन विकेट घेण्याची किमया केली. त्यानंतर शकीलने मीर हमजाच्या साथीने 300 चे आकडा पार केला. अखेर बाबरने 8 बाद 311 वर डाव घोषित करून किवींसमोर विजयासाठी 15 षटकांत 138 धावांचे लक्ष्य ठेवले. सोढीने 6 तर ब्रेसवेलने 2 बळी घेतले.

खराब प्रकाशामुळे पाकिस्तानची लाज वाचली

प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाला पहिल्याच षटकात ब्रेसवेलच्या रूपाने मोठा धक्का बसला. 5 चेंडूत 3 धावा करून तो बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांनी धडाकेबाज फलंदाजी सुरू केली. ज्यामुळे बाबर आझमला डाव घोषित करण्याचा आपला निर्णया चुकीचा होता की काय असे वाटू लागले. कॉनवे-लॅथम जोडीने 7.3 षटकांत 1 गडी गमावून 61 धावा फटकावल्या. लॅथमने 145 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 3 चौकार आणि एका षटकाच्या सहाय्याने 24 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. तर कॉनवेने 16 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 18 धावांची खेळी केली. विजयासाठी 7.3 षटकात 77 धावांची गरज असताना पंचांनी खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामना अनिर्णित राहून पाकिस्तानची लाज वाचली.

विल्यमसन सामनावीर

या सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या केन विल्यमसनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दोन्ही देशांमधील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.

पाकने पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवींनी पहिला डाव नऊ गडी बाद 612 धावांवर घोषित केला. यामुळे त्यांना पहिल्या डावात 174 धावांची आघाडी मिळाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news