राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुली अंतिम फेरीत; मुले उपांत्य फेरीत | पुढारी

राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुली अंतिम फेरीत; मुले उपांत्य फेरीत

बन्सबेरिया (प. बंगाल), वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सुरू असलेल्या 41 व्या राष्ट्रीय कुमार-कुमारी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकचा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात गतवर्षीचा उपविजेता ओडिशा संघाबरोबर होणार आहे. तर कुमार संघाने केरळचा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरू आहेत. उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकचा 12-7 असा एक डाव 5 गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे अश्विनी शिंदे (2.30 मि. संरक्षण), दीपाली राठोड (2 मि. संरक्षण व 1 गुण ), प्रीती काळे (3.10 मि. संरक्षण), संपदा मोरे (2.30 मि. संरक्षण व 4 गुण ), कल्याणी कंक (2.40 मि. संरक्षण), वृषाली भोये (5 गुण) यांनी चांगला खेळ केला. तर कर्नाटकच्या मान्या (1.40, 1.30 मि. संरक्षण), विद्या 2 गुण) यांनी चांगला खेळ केला.

मुलींच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत ओडिशा संघाने कोल्हापूरचा चुरशीच्या सामन्यात 10-9 असा 1 गुणाने पराभव केला. ओडिशा तर्फे अर्चना (2 मि. संरक्षण व 2 गुण), स्मरणिका (2, 2.10 मि. संरक्षण व 2 गुण), शुभश्री (1.50 मि. संरक्षण व 2 गुण) असा खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. तर स्वाती पाटील (2.20, 1.10 मि. संरक्षण व 2 गुण), वैष्णवी पवार (1.20 मि., 2.20 मि. संरक्षण), पूर्वा मोडक (1.30, 1.40 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी दिल्लीवर 12-7 असा एक डाव 5 गुणांनी धुव्वा उडवला. मुलींच्या दुसर्‍या सामन्यात कोल्हापूरने राजस्थानचा 10-5 असा एक डाव 5 गुणांनी असा पराभव केला.

कुमार गटात महाराष्ट्राने केरळचा 19-9 असा एक डाव 9 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रातर्फे सूरज झोरे (1.50 2.40 मि. संरक्षण), निखिल सोडये (1.50 मि. संरक्षण व 2 गुण), बिका चेतन (1. 2 मि. संरक्षण व 1 गुण), गणेश बोरकर (3 गुण ) यांनी चांगला खेळ केला. केरळ तर्फे अमोल राहसेम (2 मि. संरक्षण), सुबीन (3 गुण) यांनी खेळ केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाला प. बंगालचे आव्हान आहे.

Back to top button