ऑस्ट्रेलियात सुरू झालाय युनायटेड कप टेनिसचा थरार | पुढारी

ऑस्ट्रेलियात सुरू झालाय युनायटेड कप टेनिसचा थरार

सध्या क्रीडाशौकिनांना अगदी सुगीचे दिवस अनुभवायला मिळत आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही! क्रिकेट वर्ल्डकपनंतर फुटबॉल वर्ल्डकप आणि आता टेनिस सांघिक विजेतेपद स्पर्धा..!

गुरुवारपासून (29 डिसेंबर) सुरू झालेल्या या स्पर्धेत 18 देशांचे जागतिक दर्जाचे बहुतेक सर्व खेळाडू पहिली युनायटेड कप स्पर्धा जिंकण्यासाठी आपले कसब पणास लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्वतःच्या देशाची मान उंचावण्यासाठी पुरुष आणि महिला खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळ करणार हे उघड आहे. त्यामुळे टेनिस रसिकांना सर्वोच्च पातळीचा खेळ पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ, ब्रिस्बेन आणी सिडनी येथे 29 डिसें. ते 4 जाने. दरम्यान फेरीतील सामने होतील आणि सिडनी येथे 6 ते 9 जानेवारीला उपांत्य फेरीपासून पुढील सामने खेळले जातील. या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम आहे 15 दशलक्ष अमेरिका डॉलर्स. स्पर्धेतील कामगिरीनुसार खेळाडूंना 500 पर्यंत गुणदेखील मिळणार आहेत. त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे.

जगातील अव्वल राफेल नदाल, स्टिफानोस त्सिस्तिपास, अलेक्सझंडर झ्वेरेव्ह, ग्रीगोर डीमिट्रोव्ह, केस्पर रूड, तसेच इगा स्विटेक, पेट्रा क्विंटोवा, पॉला बडोसा, मारिया सक्कारी करोलीन गर्शिया, जेसीका पेगुला अशा बलाढ्य खेळाडूंचे कसब आणी रॅकेटची जादू व नजाकत पाहायला मिळणे ही मोठी पर्वणीच आहे. दोन देशांच्या संघातील लढत प्रत्येकी दोन पुरुष आणि महिला खेळाडू आणी एक मिश्र दुहेरी अशी होईल. पहिल्या दिवशी दिवसाच्या सत्रात ग्रीस संघाने 1 व अमेरिकेने 2 सामने जिंकले. मॅडिसन कीज आणी टेलर फ्रीटज यांनी एकेरीचे सामने सहज जिंकले. तसेच इंग्लंड 1, इटली 1 असे विजयी सामने झाले. स्तिफनोस स्तितीपास, कॅमेरून नुरी यांनी संघास विजयी सलामी दिली.

उदय बिनीवाले

Back to top button