David Warner Retirement: द्विशतकानंतरही डेव्हिड वॉर्नर नाराज, म्हणाला; ‘मी निवृत्त होणार...’ | पुढारी

David Warner Retirement: द्विशतकानंतरही डेव्हिड वॉर्नर नाराज, म्हणाला; ‘मी निवृत्त होणार...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner Retirement : 100व्या कसोटीत द्विशतक झळकावूनही ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर नाराज आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया विरुद्धचा त्याचा वाद पुन्हा एकदा समोर आला. संघ व्यवस्थापनाने आदेश दिल्यास मी निवृत्ती होण्यासही तयार आहे, असे विधान करून त्याने क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेवर विजय मिळवला. या सामन्यानंतर वॉर्नरने एका मुलाखतीदरम्यान आपली खदखद व्यक्त केली.

वॉर्नर हा मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे. त्याच्याकडे स्वबळावर संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. मोठ्या टूर्नामेंटमध्ये तो खूपच धोकादायक क्रिकेटर बनतो. ही सर्व वैशिष्ट्ये असूनही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषक स्पर्धेत वॉर्नरला कांगारू संघातून डावलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याची कुणकुण लागल्यानेच त्याने निवृत्तीबाबत धक्कादायक विधान केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (David Warner Retirement)

‘ODI विश्वचषकात खेळण्याचा माझा निर्धार’

मुलाखतीदरम्यान वॉर्नरला, द. आफ्रिकेविरुद्धची बॉक्सिंग डे कसोटी ही त्याची शेवटची कसोटी असेल का? असा बोचरा प्रश्न विचारण्यात आला. यावर डावखु-या फलंदाजाने थेट प्रतिक्रिया दिली. वॉर्नर म्हणाला, पुढील वर्षी भारतात होणार्‍या 50 षटकांच्या विश्वचषकात खेळण्याचा माझा निर्धार आहे. मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवेन आणि सतत धावा करण्याचा प्रयत्न करेन, पण जर ते (संघ व्यवस्थापन) माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की हीच वेळ आहे (निवृत्तीची), तर मी निरोप द्यायला तयार आहे,’ अशी भावना बोलून दाखवली. (David Warner Retirement)

’संस्मरणीय खेळी करण्याचा मला आत्मविश्वास’

द्विशतकी खेळीबद्दल विचारले असता वॉर्नर म्हणाला, मेलबर्न मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असताना 100 वी कसोटी खेळणे खरंच मस्त होते. अशातच संस्मरणीय खेळी करण्याचा मला आत्मविश्वास होता. मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता माझ्यात आहे, याचा मला विश्वास आहे. मी मैदानात उतरतो तेव्हा संघाला विजय मिळवून देण्याच्या उद्देशानेच खेळत असतो. आजच्या विजयात संघ सहका-यांनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळेच आम्ही सामना जिंकला. कॅमेरून ग्रीन आणि मिचेल स्टार्क यांच्यासह अॅलेक्स कॅरीने जबरदस्त प्रदर्शन केले. (David Warner Retirement)

100व्या कसोटी विक्रमी द्विशतक

वॉर्नर हा आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा जगातील 10वा तर द्विशतक पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्यामुळे जॉनी मुल्लाघ पदक प्रदान करून वॉर्नरचा मेलबर्न मैदानात सन्मान करण्यात आला.

वॉर्नरचे विक्रम!

डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत 100 कसोटी सामन्यांमध्ये 46.41 च्या सरासरीने 8122 धावा केल्या आहेत. ज्यात 25 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर वॉर्नरने 141 सामन्यात 45.16 च्या सरासरीने 6007 धावा केल्या आहेत. वनडे सामन्यांमध्ये वॉर्नरच्या नावावर 19 शतके आणि 27 अर्धशतके आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 99 टी-20 सामनेही खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32.88 च्या सरासरीने 2894 धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान वॉर्नरने एक शतक आणि 24 अर्धशतके झळकावली आहेत.

Back to top button