कॅप्टन्सीचा सूर्योदय… अवघ्या वर्षभरातच सूर्या बनला उपकर्णधार | पुढारी

कॅप्टन्सीचा सूर्योदय... अवघ्या वर्षभरातच सूर्या बनला उपकर्णधार

मुंबई; वृत्तसंस्था : वयाच्या 31 व्या वर्षी भारतीय संघात प्रवेश आणि वर्षभरात उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हणूनही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखले जाते.

श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याची कर्णधारपदी निवड झाली असून सूर्यकुमारकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तो आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला खेळाडू आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनीही त्याचे कौतुक केले आहे. भारताकडून 42 टी-20 सामन्यांत त्याने 1408 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 384 धावा चोपल्या आहेत. यंदाच्या वर्षभरात त्याने तुफानी फलंदाजी केली आहे. शिवाय मैदानाच्या कोणत्याही भागात हवी तशी फटकेबाजी करण्यात तो निष्णात मानला जातो.

360 अंशांतून फलंदाजी करणारा जगातील एकमेव खेळाडू अशी कीर्ती त्याने संपादन केली आहे. सहसा भारतीय संघात प्रवेश केल्यानंतर केवळ वर्षभरात कोणत्याही खेळाडूला थेट उपकर्णधारपदी निवडले जात नाही. सूर्याची बातच निराळी. संघात संजू सॅमसनसारखे ज्येष्ठ खेळाडू असूनही सूर्यकुमारला निवड समितीने विशेष पसंती दिली आहे. त्याने केलेल्या तडाखेबंद फलंदाजीची ही पावतीच म्हटली पाहिजे. चालू वर्षात त्याने 31 टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा कुटल्या असून त्यात दोन दणकेबाज शतकांचा समावेश आहे.

Back to top button