भारत 2036 च्या ऑलिम्पिक गेम्स भरवण्यावर दावा ठोकणार : क्रीडामंत्री | पुढारी

भारत 2036 च्या ऑलिम्पिक गेम्स भरवण्यावर दावा ठोकणार : क्रीडामंत्री

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाला 2036 मधील ऑलिम्पिक गेम्सच्या आयोजनाची संधी मिळावी, यासाठी भारत दावा ठोकणार असल्याचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 2023 च्या सप्टेंबर महिन्यात मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सर्व सदस्यांची बैठक होणार असून त्यावेळी भारत आपल्या दावेदारीचा पूर्ण रोडमॅप सादर करणार आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला ऑलिम्पिक गेम्स भारतात आयोजित करण्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करणार आहे. भारतात ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन झाले, तर गुजरातमधील अहमदाबाद हे आयोजक शहर असण्याची शक्यता आहे. कारण, तेथेच जागतिक दर्जाच्या खेळाबाबतच्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध आहे.

भारताने 1982 मध्ये आशिया स्पर्धा, 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आता भारत ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे ठाकूर यांनी नमूद केले. भारत जी-20 चे अध्यक्षपद भूषवत असेल तर मला खात्री आहे की, सरकार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या साथीने ऑलिम्पिक गेम्स आयोजित करू शकते. ऑलिम्पिकचे 2032 पर्यंतचे सर्व स्लॉट बुक झाले आहेत. मात्र, 2036 मध्ये या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत आपली दावेदारी सांगू शकतो. भारत ऑलिम्पिक गेम्स आयोजित करेल असे नव्हे, तर ते भव्य-दिव्य करून दाखवेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. जागतिक स्तरावरील मोठी स्पर्धा आयोजित करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्यासाठी गुजरातच का?

ठाकूर म्हणाले, गुजरातने अनेकदा ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्याकडे यासाठी पायाभूत सुविधा आहेत. हॉटेल्स, हॉस्टेल्स, विमानतळ, क्रीडा संकुले आहेत. गुजरात सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात ऑलिम्पिक गेम्स गुजरातमध्ये आयोजित करण्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे गुजरातमध्ये ऑलिम्पिक गेम्स व्हायला हरकत नाही, असे त्यांनी सांगितले.

Back to top button