Boxing Day Test : बॉक्सिंग-डे कसोटीवर कांगारूंचे निर्विवाद वर्चस्व; अ‍ॅलेक्स कॅरीचे शतक; दक्षिण आफ्रिका संकटात | पुढारी

Boxing Day Test : बॉक्सिंग-डे कसोटीवर कांगारूंचे निर्विवाद वर्चस्व; अ‍ॅलेक्स कॅरीचे शतक; दक्षिण आफ्रिका संकटात

मेलबर्न; वृत्तसंस्था : यजमान ऑस्ट्रेलियाने येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग-डे कसोटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तिसर्‍या दिवसाच्या खेळात त्यांनी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर 371 धावांची आघाडी घेतली. एवढेच नव्हे, तर दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिकेलाही पहिला धक्काही दिला आहे. अ‍ॅलेक्स कॅरीचे शतक हे तिसर्‍या दिवशीच्या खेळाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

बुधवारी खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या डावात 1 बाद 15 धावा केल्या होत्या. सरेल एरवी 7 धावांवर नाबाद आहे, तर थ्युनिस डी ब्रुयन 6 धावांवर खेळत आहे. कर्णधार डीन एल्गर खातेही न उघडता तंबूत परतला. कर्णधार पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्याआधी कांगारूंनी आपला पहिला डाव 8 बाद 575 धावांवर घोषित केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 189 धावा केल्या होत्या.

हेडचे अर्धशतक दुसर्‍या दिवशी नाबाद परतलेल्या ट्रॅव्हिस हेडने (51) आपले 11 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. तसेच अ‍ॅलेक्स कॅरीने (111 धावा) पहिले कसोटी शतक झळकावले. हेडने आदल्या दिवशीच्या 48 धावा केल्या होत्या. तिसर्‍या दिवशी त्याला या धावसंख्येमध्ये केवळ 3 धावांची भर घालता आली. त्याला एनरिक नोर्टेने त्रिफळाबाद केले. दुसर्‍या टोकाकडून कॅरीने संयमी शतक झळकावले. मार्को जॉन्सनने त्याला बाद करून तंबूत पाठवले.

दुखापतीमुळे निवृत्त झालेले कॅमेरून ग्रीन आणि डेव्हिड वॉर्नर दुसर्‍या दिवशी क्रीझवर परतले. ग्रीनने अर्धशतक (51 धावा) केले. मात्र, वॉर्नर (200) त्याच्या वैयक्तिक धावसंख्येत भर घालू शकला नाही. त्याला एनरिक नोर्टेने टिपले. एक दिवस आधी वॉर्नरने दुहेरी शतक साजरे केले तेव्हा त्याला दुखापत झाली होती.

नोर्टेने घेतले 3 बळी

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना एनरिक नोर्टेने 3 बळी घेतले. कागिसो रबाडाने दोन बळी मिळवले. तसेच लुंगी एनगिडी आणि मार्को जॉन्सन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

कॅरीचे ऐतिहासिक कसोटी शतक!

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज लेक्स कॅरीने द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करून बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसर्‍या दिवशी शतक झळकावले. कांगारू संघासाठी बॉक्सिंग-डे कसोटीत शतक झळकावणारा तो इतिहासातील दुसरा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. कॅरीने 15 व्या कसोटीत तीन आकडी धावसंख्या गाठली. त्याने कसोटी करिअरमधील पहिले शतक 133 चेंडूंत पूर्ण केले. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात कॅरी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. त्यावेळी संघाची धावसंख्या 400 होती. त्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी करून स्वत:चे पहिले शतक पूर्ण केलेच त्याचबरोबर त्याने संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

  • गेल्या 9 वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा कॅरी हा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ठरला आहे. याआधी 2013 साली ऑस्ट्रेलियाकडून यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने (118) अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटीत शतक पूर्ण केले होते.
  • यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी दिवंगत यष्टिरक्षक रॉडनी मार्श यांनी 1977 मध्ये अ‍ॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीत शतकी (110) खेळी साकारली होती.

Back to top button