कोल्हापूर : फुटबॉल हंगामाचा आज किक ऑफ | पुढारी

कोल्हापूर : फुटबॉल हंगामाचा आज किक ऑफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  तमाम फुटबॉलप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली असून सन 2022-23 या वर्षातील फुटबॉल हंगामास मंगळवारपासून (27 डिसेंबर) प्रारंभ होत आहे. शाहू छत्रपती फुटबॉल लीगने हंगाम सुरू होईल. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) तर्फे या छत्रपती शाहू स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैदानाची आखणी, रंगरंगोटीसह विविध कामे पूर्ण करून मैदान पुढील हंगामासाठी सज्ज करण्यात आले आहे.

लीग सामन्याचे उद्घाटन संस्थेचे पेट्रन इन चीफ शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी होईल. यावेळी मनपाच्या प्रशासक सौ. कादंबरी बलकवडे, शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण व केएसएचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. लीग स्पर्धेत वरिष्ठ गटातील 16 संघांचा सहभाग असणार आहे. यात सुपर 8 व सीनियर 8 या दोन गटांतर्गत दररोज दोन याप्रमाणे एकूण 56 सामने होणार आहेत.

फुटबॉल मैदानाच्या पश्चिम बाजूच्या बैठक व्यवस्थेसाठी तिकीट दर 20 रुपये तर पूर्व बाजूच्या बैठक व्यवस्थेसाठी तिकीट दर 10 रुपये असणार आहे. पश्चिमेकडील प्रेक्षक गॅलरीतील खुर्चीसाठी 50 रुपये तिकीट दर असून याची विक्री लाईफ मेंबर कक्षाच्या बाहेर केली आहे.
लीग सामने शांततेत पार पाडणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन के.एस.ए.च्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button