टीम इंडियासाठी गुड न्यूज | पुढारी

टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई; वृत्तसेवा : येत्या नव्या वर्षात टीम इंडियाचे वेळापत्रक खूपच व्यस्त असणार आहे. घरच्या मालिका, आयपीएल, वनडे विश्वचषक इत्यादी आणि बरेच सामने होणार आहेत. त्यामुळे भारताच्या सर्व खेळाडूंना कंबर कसून तयार राहावे लागणार आहे. टीम इंडियाचे दुखापत झालेले खेळाडू या सर्व सामन्यांदरम्यान संघात परतण्याची शक्यता आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माही सध्याच्या घडीला दुखापतग्रस्त असून संघाबाहेर आहे. पण जानेवारीमध्ये होणार्‍या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार असल्याचे संकेत त्याने स्वतःच दिले आहेत. विशेष म्हणजे त्याने सोमवारी मुंबई रणजी संघासोबत सरावही केला.

नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा संघात परंतु शकतो. बोटाच्या दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता, पण आता तो मुंबईतील बीकेसी येथील अकादमी मैदानावर नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले, रोहितने आज सकाळी 15 मिनिटे नेटवर आणि नंतर मुंबई रणजी संघाच्या नेटवर स्वतंत्रपणे फलंदाजी केली. त्यानंतर तो मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्येही आला.

रोहित शर्माच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तसेच, त्याच्या जागी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात येणार आहे, जो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताची धुरा सांभाळेल. मात्र, टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने अशा कोणत्याही गोष्टीला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तर याचआठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला जाईल. मात्र, केएल राहुल या मालिकेतून बाहेर पडल्याची चर्चा जोरात आहे. तो आपल्या लग्नासाठी मालिकेला बाजूला ठेवण्याची शक्यता आहे.2022 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले ठरले नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचा बॅटसोबतचा संघर्ष अधिक दिसून येतो. राहुलचा 2022 मध्ये 16 सामन्यांमध्ये 126.53 चा स्ट्राइक रेट होता.

Back to top button