

दोहा; वृत्तसंस्था : फुटबाल जगातील सगळे पुरस्कार मिळाले; परंतु त्याच्या खजिन्यात वर्ल्डकप नव्हता. लियोनल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्षे अथक परिश्रम करत होता ते अखेर पूर्ण झाले. 2014 ला वर्ल्डकप विजयाचे भंगलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लियोनल मेस्सीचा अखेरच्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीस तोड खेळ झाला अन् कायलिन एम्बाप्पे एकटा भिडला. 120 मिनिटांच्या सामन्यात 3-3 अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.
फुटबॉलमध्ये अखेरच्या सेकंदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्डकप फायनलमध्ये आली. 80 व्या मिनिटापर्यंत 2-0 अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला 1 मिनीट व 37 सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एम्बाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले. 8 मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त 30 मिनिटांत गेला. पहिली 15 मिनिटे तोडीस तोड खेळ झाल्यानंतर लियोनल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने 108 व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून दिला असे वाटत असताना एम्बाप्पेने गोल करून सामना 120 मिनिटांच्या खेळात 3-3 असा बरोबरीत सोडवला.
अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला. नवव्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला. 19 व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरुडभरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली; परंतु तो पोस्टच्या वरून गेला. 21व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने गोल नोंदवला. 36 व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडू मॅक एलिस्टरने चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी 2-0 अशी झाली. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स निराश झालेले दिसले.
दुसर्या हाफमध्येही अर्जेंटिनाचा तोच पवित्रा दिसला अन् 48 व्या मिनिटाला त्यांच्याकडून आणखी एक ऑन टार्गेट प्रयत्न झाला. 79 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस ओटामेंडीने पेनल्टी क्षेत्रात स्टीव्ह मँडांडाला पाडले अन् फ्रान्सला पेनल्टी मिळाली. कायलिन एम्बाप्पेने गोल करून फ्रान्सला सामन्यात आणले. 81व्या मिनिटाला एम्बाप्पेने अर्जेंटिनाची बचाव भिंत भेदली अन् सामना 2-2 असा बरोरीत आणला. जबरदस्त व्हॉलीद्वारे त्याने हा गोल केला.
फ्रान्सच्या या कमबॅकने अर्जेंटिनाचे खेळाडू बिथरले आणि त्यांच्याकडून आता धक्काबुक्की होऊ लागली. 104 व्या मिनिटाला मेस्सीने भन्नाट गोल केलाच होता; परंतु फ्रान्सच्या खेळाडूंनी सुरेख ब्लॉक केला. पुढच्याच मिनिटाला अकुनाने फ्रान्ससाठी आणखी एक गोल रोखला अन् या वेळेस गोल प्रयत्न करणारा लौटारो मार्टिनेझ होता. त्याने रेफरीकडे पेनल्टीची मागणी केली. 107 व्या मिनिटाला मेस्सीचा गोल रोखला गेला. पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाने गोल केला. मार्टिनेझचा तो प्रयत्न गोलरक्षकाने रोखला; परंतु चेंडूवर ताबा राखता न आल्याने मेस्सीला गोल संधी मिळाली आणि अर्जेंटिनाने 3-2 अशी आघाडी घेतली. 116 व्या मिनिटाला हँड बॉलमुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली एम्बाप्पेने त्यावर गोल करून सामना पुन्हा 3-3 असा बरोबरीत आणला.
एम्बाप्पे (23 वर्षे आणि 363 दिवस) सलग दुसर्या वर्ल्डकपमध्ये गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू.
सामन्यातील तिसरा गोल हा 23 वर्ष व 363 दिवसांच्या एम्बाप्पेचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील आठवा आणि एकंदर अकरावा गोल ठरला. त्याने गेर्ड मुलरचा (24 वर्ष व 226 दिवस) विक्रम मोडला.
वर्ल्डकप स्पर्धा इतिहासात फायनलमध्ये हॅट्ट्रिक करणारा एम्बाप्पे दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी 1966 मध्ये इंग्लंडच्या जॉफ हर्स्ट यांनी जर्मनीविरुद्ध हा पराक्रम केला होता.