फायनल कतारमध्ये… जल्लोष कोल्हापुरात | पुढारी

फायनल कतारमध्ये... जल्लोष कोल्हापुरात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अर्जेंटिना जिंकणार की फ्रान्स? अशी रंगलेली चर्चा, आपलाच संघ जिंकणार यासाठी लागलेल्या पैजा, अंतिम सामना पाहण्यासाठी सिनेमा थिएटरसह चौकाचौकांत उभारलेल्या भव्य स्क्रीन, यावेळी फुटबॉलप्रेमींनी एकत्रित येऊन ध्वज फिरवत, टाळ्या-शिट्ट्यांसह केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणाची निमिर्र्ती फुटबॉलवेड्या कोल्हापुरात झाली होती. रविवारी रात्री वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. यामुळे सुमारे दोन तास कोल्हापूरला कतारसद़ृश स्वरूप प्राप्त झाले होते.

रविवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी फुटबॉलप्रेमींच्या वतीने करण्यात आली होती. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अवघे कोल्हापूर फुटबॉलमय बनले होतेच. शहरातील पेठा, उपनगरे आणि ग्रामीण भागातील तालीम संस्था-तरुण मंडळे, फुटबॉल क्लबतर्फे गल्ली-बोळ आणि चौकाचौकांत फुटबॉलपटूंचे डिजिटल, भव्य कटआऊटस् आणि वर्ल्डकपमध्ये सहभागी विविध देशांचे ध्वज, पताका, किट आणि रांगोळ्यांची विविधता एकवटली होती. प्रत्येकाने आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केल्याने ईर्ष्या शिगेला पोहोचली होती.

सामना रात्री साडेआठ वाजता, सुरू होणार असला, तरी रविवारी सकाळपासूनच फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्टाग्राम यासह विविध प्रकारच्या सोशल मीडियावरून अंतिम सामन्याची वातावरण निर्मिती झाली होती. सायंकाळनंतर चौकाचौकांत भव्य स्क्रीन उभारण्यात आल्या. फ्रान्स व अर्जेंटिनाचे ध्वज, पताका लावण्यात आल्या.

मेस्सीसह विविध खेळाडूंचे फलक व रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. सामना सुरू होण्यापूर्वीच फुटबॉलप्रेमी स्क्रीनसमोर एकवटले. आपापल्या फुटबॉल संघांतील खेळाडूंना व त्यांच्या खेळाला भरभरून प्रोत्साहन देत टाळ्या-शिट्ट्या वाजवल्या. मेस्सीने पहिला गोल केल्यावर अर्जेंटिनाच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. पूर्णवेळ हा जल्लोष कायम होता. सामना झाल्यानंतर विजयी संघाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. साऊंड सिस्टीमच्या ठेक्यात फटाक्यांची आतषबाजी करत ठेका धरला. इतकेच नव्हे, तर शहरातून विजयी रॅलीही काढली.

शहरातील गल्ली-बोळांत स्क्रीन

शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ अशा सर्व पेठांत चौकाचौकांत मॅच पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. याशिवाय गल्ली-बोळांतही लहान-लहान स्क्रीनसमोर फुटबॉलप्रेमींनी सामन्याचा आनंद लुटला. यात महिलाही आघाडीवर होत्या.

साऊंड सिस्टीमवर धरला ठेका

अर्जेंटिनाकडून दुसरा गोल झाल्यावर जल्लोष अधिकच वाढला. अर्जेंटिनाचे ध्वज घेऊन साऊंड सिस्टीमवर सर्वांनी एकच ठेका धरला. दहा नंबरचा मेस्सीचा टी-शर्ट, अर्जेंटिनाचे ध्वज घेऊन आबालवृद्धांनी जल्लोष केला.

तीन तास अनुभवला थरार

सामना संपायला 10 मिनिटांचा अवधी असताना फ्रान्सने लागोपाठ दोन गोलची परतफेड केली, यामुळे सामना 2-2 असा बरोबरीत झाला. त्यामुळे अर्जेंटिनाचे समर्थक शांत झाले, तर फ्रान्सचे समर्थकांनी प्रचंड जल्लोषासह फटाक्यांच्या आतषबाजीस सुरुवात केली. सामन्याचे पारडे जसजसे एकमेकांच्या विरोधात जात होते, तसतशी फुटबॉलप्रेमींची उत्कंठा वाढत होती. अनेकजण एकमेकाला फोनद्वारेही सामन्याचा थरार सांगत ईर्ष्याही वाढवत होते. सुमारे तीन तास चाललेल्या या सामन्याचा थरार कोल्हापूरकरांनी अनुभवला.

पेनल्टी शूट आऊटचा थरार अन् एकच जल्लोष

सामना पूर्ण वेळ तीन-तीन बरोबरीनंतर निकालासाठी पेनल्टीचा अवलंब करण्यात आला. त्यावेळी दोन्हीकडचे समर्थक श्वास रोखून होते. मात्र, अर्जेंटिनाने आघाडी घेत सामना जिंकून विश्वचषक पटकावताच कोल्हापुरात एकच जल्लोष आणि आतषबाजी सुरू झाली.

छत्रपती शिवाजी चौकात जल्लोषाला मज्जाव

सामना संपल्यानंतर अनेकजण दुचाकी, चारचाकीतून शिवाजी चौकाकडे येत होते. मात्र चौकाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी अडविले होते. कोणालाही शिवाजी चौकात प्रवेश दिला नाही. त्यामुळे अर्जेंटिना समर्थक शहराच्या अनेक मार्गांवर दुचाकी, चारचाकीने जल्लोष करत फिरत होते.

मिरजकर तिकटीवर जल्लोष

मिरजकर तिकटी येथे समर्थकांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार मेस्सीचे भव्य कटआऊट आणले. त्यासमोर आतषबाजी करत जल्लोष सुरू केला. शिवाजी चौकातून परतणार्‍या समर्थकांना ही माहिती मिळताच अनेकजण या जल्लोषात सहभागी झाले आणि पाहता पाहता शिवाजी चौकासारखी परिस्थिती मिरजकर तिकटी येथे झाली. कसबा बावडा येथेही तरुणांनी दुचाकी रॅली काढत, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

Back to top button