

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला दुसरा डाव्यात ३२४ धावांमध्ये गुंडाळले. ( Ind vs Ban Test Day 5 ) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनी चमकदार कामगिरी केली. आता दुसरा कसोटी सामना गुरुवार, २२ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्ध कसोटीतील हा सलग चौथा विजय आहे. कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया अजिंक्य आहे.
भारत आणि बांगला देश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी बांगलादेशने 6 बाद 272 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी तिसर्या षटकामध्येच भारताला यश मिळाले. १३ धावांवर खेळत असणार्या मेहदी हसन याला सिराजने तंबूत धाडले. ( Ind vs Ban Test Day 5 ) यानंतर बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणार्या शाकिब याला कुलदीप यादवने त्रिफळाचीत केले. तो ८४ धावांवर बाद झाला. भारताला पहिली कसोटी जिंकण्यासाठी केवळ दोन विकेटसची गरज होती. कुलदीप यादव याने इबादोत हुसेन याला शून्य धावांवर तर अक्षर पटेल याने तैजुल इस्लाम याला चार धावांवर बाद करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. बांगलादेशचा दुसरा डाव ३२४ धावांवरच गुंडाळला गेला.
दुसर्या डावातही भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची जादू पाहण्यास मिळाली. अक्षर पटेल याने चार तर कुलदीप यादव याने तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताच्या दुसर्या डावात शुभमन गिल याने ११० तर चेतेश्वर पुजाराने याने नाबाद १०२ धावांची खेळी केली होती. पुजारा याने तब्बल ५१ डाव आणि तीन वर्ष ११ महिन्यांनंतर कसोटीमध्ये शतक झळकावले हाते. पुजाराचे हे १९ वे शतक ठरले. भारताने दुसर्या डावात बांगलादेशला ५१३ धावांचे लक्ष्य दिले होते.
बांगलादेशचे फलंदाज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच गुडघे टेकतील असे वाटले होते; पण २४ वर्षीय पदार्पणवीर जाकिर हसन भारतीय गोलंदाजांना भिडला. त्याने पदार्पणात शतक झळकावून टीम इंडियाचे टेन्शन वाढवले होते; परंतु अक्षर पटेलने अखेरच्या काही षटकांत झटपट धक्के देत भारताला कमबॅक करून दिले.
शुक्रवारी ( दि. १६ ) मैदानावर नाबाद असलेल्या जाकिर हसन व नजमूल शांतो (67) यांनी शनिवारीही पहिल्या सत्रात दमदार खेळ केला. पण, लंच ब्रेकनंतर उमेश यादवने भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. नजमूल व हसन यांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध ही चौथ्या डावात सलामीवीरांची चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अक्षर पटेलने दुसरा धक्का देताना यासीर अलीला 5 धावांवर त्रिफळाचीत केले. लिटन दासही 19 धावांवर बाद झाला.
मुशफिकर रहिम आणि शाकिब अल हसन ही अनुभवी जोडी मैदानावर होती आणि ऋषभ पंतने सोपा झेल सोडून रहिमला जीवदानही दिले होते. पण, अक्षरने 23 धावांवर रहिमचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नुरूल हसन (3) याला ऋषभने चपळाईने यष्टिचीत केले. बांगलादेशने चौथ्या दिवसअखेर 6 फलंदाज 272 धावा केल्या. शाकिब व मेहिदी हसन मिराज यांनी दिवसअखेर खिंड लढवली आहे. पाचव्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 241 धावांची गरज होती. तर भारताला विजयासाठी चार विकेटस् हव्या होत्या.
24 वर्षीय पदार्पणवीर जाकिर हसन हा भारतीय गोलंदाजांसमोर उभा राहिला आणि त्याने खणखणीत शतक झळकावले. मागील 10 वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात पदार्पणात शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी 2021 मध्ये कायले मेयर्सने बांगला देशविरुद्ध चट्टोग्राम येथे विक्रमी शतक झळकावले होते. कसोटी पदार्पणात शतक करणारा तो बांगला देशचा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी अमिमूल इस्लाम (वि. भारत, ढाका, 2000), मोहम्मद अश्रफुल (वि. श्रीलंका, कोलंबो, 2001) आणि अबुल हसन (वि. वेस्ट इंडिज, खुल्ना, 2012) यांनी हा पराक्रम केला होता.
पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी ६ गडी गमावत २७८ धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यर हा ८२ धावांवर नाबाद होता. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने ९०, ऋषभ पंत ४६, शुभमन गिल २०, कर्णधार केएल राहुल २२ तर अक्षर पटेल याने १४ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात विराट कोहली १ धावावर बाद झाला. कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी भारताचा डाव ४०४ धावांवर आटोपला.
भारतीय फिरकीपटूंच्या प्रभावी कामगिरीमुळे बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांमध्ये आटोपला. पहिल्या डावात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने ५ बळी घेतले. तर मोहम्मद सिराज याने ३ तर उमेश यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.बांगलादेशच्या पहिल्या डावात मुशफिकुर रहीम याने सर्वाधिक २८ धावा केल्या होत्या. तसेच लिटन दास याने २४ तर जाकिर हसन याने २० धावा केल्या होत्या. भारताला २५४ धावांची आघाडी मिळाली होती. बांगलादेशला फॉलोऑन देण्याची संधी होती. मात्र कर्णधार केएल राहुल याने दुसर्या डावात फलंदाजीचा निर्णय घेतला होता.