

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयपीएल 2023 चा हंगाम आता जवळ आला आहे. गेल्यावर्षीपासून आयपीएलमध्ये दहा संघ झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआयला यावेळीचा आयपीएल हंगाम लांबवायचा होता, मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे त्यांच्या अपेक्षेवर पुन्हा एकदा पाणी पडले आहे. त्यांच्या नियोजनातील 14 दिवसांची कपात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा पुढचा हंगाम फक्त 60 दिवसांचा असेल. बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामाची तारीख अद्याप जाहीर केली नाही. मात्र, ही स्पर्धा 1 एप्रिलपासून सुरू होऊ शकते आणि 31 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे बीसीसीआयच्या मनसुब्यांवर पाणी पडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेच्या 7 दिवस आधी आणि नंतर कोणतीही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकत नाही. आयपीएलचा आगामी हंगाम याच कारणामुळे 60 दिवसांचा असणार आहे, कारण महिला आयपीएल मार्चमध्ये सुरू होणार आहे.