

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने 2 बाद 258 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. अशाप्रकारे पहिल्या डावात 274 धावांची भर घालत 512 धावांचा डोंगर रचला आणि यजमाना बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य दिले. सामन्याच्या तिस-या दिवशी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (110) आणि मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (नाबाद 102) यांनी शतकी खेळी साकारली. गिल बाद झाल्यानंतर भारताने पुजाराला शतक पूर्ण करण्यासाठी वेळ दिला. पहिल्या डावात 90 धावा करून बाद झालेल्या पुजाराने अखेर त्याच्या कारकिर्दीतील 19वे शतक पूर्ण केले. तब्बल 51 व्या इनिंगनंतर त्याला तीन आकडी धावसंख्या गाठण्यात यश आले आहे. यानंतर लगेचच कर्णधार केएल राहुलने डाव घोषित केला. त्यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात विकेट न गमावता 42 धावा केल्या. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी असून त्यांना विजयासाठी 470 धावांची गरज आहे.
तत्पूर्वी, भारताच्या 404 धावांचा पाठलाग करताना बांगला देशचा संघ तिसऱ्या दिवशी 150 धावांवर गुंडाळला. कुलदीप यादवने यजमानांचा निम्मा संघ गारद केला. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर कुलदीप यादवने इबादोत हुसेनला (17) माघारी पाठवले. पंतने त्याचा झेल घेतला. तर अक्षर पटेलने मेहदी हसन मिराझची (25) शेवटची विकेट घेतली. बांगलादेशचा पहिला डाव 55.5 षटकांत सर्व बाद 150 धावांवर गुंडाळला. कुलदीपने कारकिर्दीत तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेतल्या. 22 महिन्यांनंतर पहिली कसोटी खेळत असलेल्या कुलदीपने 40 धावांत पाच विकेट मिळवल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 13 षटकात 20 धावा देत तीन बळी घेतले. तर अक्षर पटेल आणि उमेश यादवला 1-1 बळी घेण्यात यश आले.
भारताने बांगलादेशवर 250 हून अधिक धावांची आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशला फॉलोऑन न देता टीम इंडियाने दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 36 धावा केल्या. यासह भारताची एकूण आघाडी 290 धावांवर पोहोचली. 22.4 व्या षटकात खालेद अहमदने भारताचा पहिला झटका दिला. त्याने केएल राहुलला (62 चेंडूत 23 धावा) माघारी धाडले. यानंतर शुभमन गिलने पुजारासह डाव सांभाळला. दोघांनी 113 धावांची भागिदारी रचली. यादरम्यान गिलने शतकी खेळी साकारली. मात्र, संघाच्या 183 धावसंख्येवर गिल तंबूत परतला. त्याला मेहदी हसन मिराजने महमुदुल हसन जॉय करवी झेलबाद केले. गिलने 152 चेंडूत 110 धावा केल्या. यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. दोघांनी संयमी खेळी करत धावसंख्येत भर घातली. अखेर चेतेश्वर पुजाराने शतक पूर्ण करताच भारताने डाव घोषित केला. पुजारा-कोहली जोडीने 75 धावांची भागिदारी केली.