FIFA WC : रोमहर्षक लढतीत फ्रेंचांचा ब्रिटीशांवर विजय! फ्रान्सची सलग दुस-यांदा सेमीफायनलमध्ये धडक | पुढारी

FIFA WC : रोमहर्षक लढतीत फ्रेंचांचा ब्रिटीशांवर विजय! फ्रान्सची सलग दुस-यांदा सेमीफायनलमध्ये धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA WC England vs France : फिफा वर्ल्ड कपच्या चौथ्या उपांत्यपूर्व लढतीत गजविजेत्या फ्रान्सने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून सलग दुस-यांदा सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता त्यांचा सामना मोरोक्कोशी होणार असून हा सामना 14 डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता खेळवला जाणार आहे. फ्रान्सच्या विजयात पुन्हा एकदा गिराडने महत्त्वाची भूमिका बजावत ऐन मोक्याच्या क्षणी गोल करून सामन्याचे चित्र पालटले. 1982 आणि 1986 नंतर प्रथमच फ्रान्सने सलग दुस-यांदा उपांत्य फेरी गाठली असून इंग्लंडचा संघ सातव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला आहे.

इंग्लंड-फ्रान्स सामन्याकडे सर्व जगाच्या नजरा लागल्या होत्या. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि प्रतिस्पर्धी संघांवर गोल मारण्यासाठी त्यांच्या डी-पर्यंत धडका मारल्या. यात 17 व्या मिनिटाला फ्रान्सला यश आले. त्यांच्या ओरेलियन चौमेनीने ब्रिटीशांच्या डी-बाहेरून उजव्या पायाने जोराचा फटका मारत गोल जाळे भेदले. याचबरोबर फ्रान्सने 1-0 अशी आघाडी मिळवून इंग्लिश चाहत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. पण फ्रान्सच्या आघाडीने केनसेना खचली नाही. त्यांनी प्रतिआक्रमण करून गोल फेडण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला. या दरम्यान, इंग्लंडला पाच संधी मिळाल्या. यापैकी तीन शॉट्स हे लक्ष्यावर होते, पण फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरिसने उत्कृष्ट सेव्ह करत त्यांचे आक्रमण परतवून लावले. त्याचवेळी फ्रान्सने तीन शॉट्स मारले त्यातील दोन लक्ष्यावर होते. यातील एका शॉटवर गोल नोंदवला गेला. हाफ टाईमपर्यंत फ्रान्सने आपली एक गोलची आघाडी कायम ठेवली.

दुस-या हाफ टाईमपासून इंग्लंडने पुन्हा फ्रान्सच्या गोलपोस्टवर धडका मारायला सुरुवात केली. यातील एका चढाईदरम्यान फ्रान्ससाठी गोल करणाऱ्या चुआमेनीने मोठी चूक केली. त्याने इंग्लंडच्या बुकायो साकाला डी-मध्ये धोकायाकरित्या पायात-पाय घालून पाडले. ही बाब रेफरींच्या नजरेस येताच त्यांनी इंग्लंडला पेनल्टी बहाल केली. 54 मिनिटाला इंग्लिश कर्णधार हॅरी केनने या संधीचे सोने केले. त्याने फ्रान्सचा गोलरक्षक लॉरिसला चकवत चेंडू वेगाने फटकावून तो गोलपोस्टच्या उजव्या कोप-यात पाठवला. या गोलच्या जोरावर इंग्लिश संघाने सामन्यात बरोबरी साधली.

पण त्यानंतर फ्रान्सच्या खेळाडूंनी सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना पुन्हा एकदा इंग्लंडची बचावफळी उद्ध्वस्त केली. 78 व्या मिनिटाला ऑलिव्हियर गिरडने ग्रिजमनच्या शानदार लाँग पासवर हेडरद्वारे गोल करून फ्रान्सची आघाडी दुप्पट केली. यानंतर केन सेनेने कौंटर ॲटॅक करत 81 मिनिटाला फ्रान्सच्या डी-पर्यंत धडक मारली. पण यावेळी फ्रान्सच्या हर्नांडिसने इंग्लंडच्या मेसन माउंटला धक्का देवून पाडले. याची गंभीर दखल घेत रेफरींनी इंग्लंडला पुन्हा एक पेनल्टी बहाल केली. पिछाडीवर पडलेल्या इंग्लिश संघाला सामन्यात बरोबरी साधण्याची सुवर्ण संधी चालून आली. केनने चेंडूचा ताबा घेतला. या पेनल्टीवर तो गोल करणार अशी सर्वांना खात्री होती. पण, यावेळी केन चुकला. त्याने चेंडू गोलपोस्टवरून फटकावत या संधीची माती केली. इंग्लंडच्या खेळांडूंवर दडपण वाढले. ते सामन्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करू शकले नाहीत. अखेर सामनासंपेपर्यंत फ्रान्सने 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.

गिराड सर्वाधिक गोल करणारा दुसरा वयस्कर खेळाडू

एकाच विश्वचषकात किमान चार गोल करणारा गिराड (फ्रान्स) हा 36 वर्षांपेक्षा जास्त वयाचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी कॅमेरूनच्या रॉजर मिलाने 38 व्या वर्षी 1990 च्या वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी केली होती.

Image

ग्रिझमन चौथा खेळाडू…

ग्रिझमनच्या असिस्टवर गिराडने गोल केला. ग्रिझमनच्या असिस्टवर चुआमेनीनेही गोल केला. विश्वचषकाच्या एकाच सामन्यात फ्रान्ससाठी दोन असिस्ट करणारा ग्रिझमन हा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी जीन टिगाना, डॉमिनिक रोचेटिया आणि करीम बेंझेमा यांनी अशी कामगिरी केली आहे.

केन ठरला इंग्लंडसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

इंग्लंडसाठी सर्वाधिक गोल करणारा केन (80 सामने) हा संयुक्तरित्या दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने वेन रुनीच्या (120 सामने) विक्रमाची बरोबरी केली असून फ्रान्स विरुद्ध पेनल्टीवर यश मिळवत त्याने इंग्लंडसाठी 53 वा गोल नोंदवला.

Image

फ्रान्सच्या विजयी इतिहासाची पुनरावृत्ती

हाफ टाईममध्ये आघाडी घेतल्यानंतर फ्रान्सचा संघ विश्वचषक स्पर्धेत कधीही पराभूत झालेला नाही. या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासह फ्रेंच संघाने गेले 26 पैकी 25 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. तर पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडचा संघ विश्वचषकात एकही सामना जिंकू शकलेला नाही. या स्थितीत इंग्लिश संघाने दोन सामने अनिर्णित ठेवले असून त्यांना सात सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

इतिहास रचण्यापासून फ्रान्स आता फक्त दोन पावले दूर

इतिहास रचण्यापासून फ्रान्स आता फक्त दोन पावले दूर आहे. फ्रान्सचा संघ विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरला तर गेल्या 60 वर्षांत सलग दोन विश्वचषक जिंकणारा तो पहिला संघ ठरेल. याआधी ब्राझीलच्या संघाने अशी कामगिरी केली आहे. त्यांनी 1958 आणि 1962 मध्ये सलग दोन विश्वचषक जिंकले आहेत. त्यानंतर एकाही संघाला सलग दोन विश्वचषक जिंकता आलेले नाहीत.

फ्रान्स सातव्यांदा उपांत्य फेरीत

फ्रान्सचा संघ सातव्यांदा फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. 1982 आणि 1986 नंतर प्रथमच फ्रान्सने सलग दुस-यांदा सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडचा संघ सातव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला आहे. ही बाब इतर कोणत्याही संघापेक्षा जास्त आहे.

डिडिएर डेशॉ यशस्वी प्रशिक्षक

डिडिएर डेशॉ यांनी या फ्रान्स संघासोबत विश्वचषकातील 17 सामन्यांचे प्रशिक्षकपद भूषवले असून, त्यापैकी 13 सामने संघाने जिंकले आहेत. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. तर दोन सामन्यात फ्रान्सचा पराभव झाला आहे. केवळ ब्राझीलचे माजी प्रशिक्षक फेलिप स्कोलारी (14) आणि हेल्मुट शॉन (16) यांनी डेशॉ यांच्यापेक्षा जास्त सामने जिंकले आहेत.

 

Back to top button