‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान पुण्यालाच

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान पुण्यालाच
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणार्‍या 65 व्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने दिल्या आहेत. 'महाराष्ट्र केसरी' अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.

नवी दिल्ली येथे खा. बृजभूषण शरण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. खा. बृजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि 'महाराष्ट्र केसरी'चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबीयांकडे 'महाराष्ट्र केसरी'चे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि कुस्तीला आणखी उंचीवर नेता येईल, अशा प्रकारचे आयोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

बृजभूषण सिंह म्हणाले, महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. 11 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली जावी, असे प्रयत्न आहेत. या स्पर्धेसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यातून अनेक कुस्तीगीर घडले. तालीम संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. तेव्हा ही स्पर्धा चांगल्या स्वरूपात पार पडेल.

शरद पवार मुख्य आश्रयदाते…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थीने कुस्तीगीर परिषदेतील वादावर तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार यांना मुख्य आश्रयदाते म्हणून कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आला आहे, बाळासाहेब लांडगे यांना आश्रयदाते म्हणून परिषदेत सामावून घेण्यात आले आहे.

शरद पवार, लांडगे यांचे राजीनामे

शरद पवार यांनी या परिषदेच्या अध्यक्षपदाचा तर बाळासाहेब लांडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा भारतीय कुस्ती महासंघाकडे दिला आहे. भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे काम नवीन कार्यकारिणी पाहणार आहे.

वेट अँड वॉच : आ. संग्राम जगताप

नगर, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचा मान नगरला मिळाला असून, तसे पत्र स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आम्हाला दिले आहे. त्यांनी स्वतः 25 ते 31 डिसेंबरची तारीख आम्हाला दिली आहे. या स्पर्धेसाठी दोन जिल्हे आघाडीवर होते. पुण्यातील काही लोकांनी दिल्लीला जाऊन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याकडून पत्र घेतले आहे; परंतु दोन संघटनांचा वाद कोर्टात असून, येत्या रविवारी पुन्हा बैठक होणार आहे, यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आमची 'वेट अँड वॉच' हीच भूमिका राहील, असे संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news