महाराष्ट्र केसरीचा गोंधळात गोंधळ | पुढारी

महाराष्ट्र केसरीचा गोंधळात गोंधळ

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याला की नगरला घ्यायची, याबाबतचा वाद सुरू असून, आता भारतीय कुस्ती महासंघानेच अस्थायी समितीच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पुण्याला घेण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे. महासंघाच्या वतीने दिल्ली येथे पुण्याचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांना अधिकृत पत्रही देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे, तर स्पर्धा आयोजनाचा मान नगरलाच देण्यात आला आहे, असा दावा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप आणि डॉ. संतोष भुजबळ यांनी दिली. दोन्ही गटांच्या दावे-प्रतिदाव्यांमुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्पर्धा व निवड चाचणी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर अस्थायी समितीची नेमणूक करण्यात आली असून, समितीचे चेअरमन संजय सिंह यांना सर्व स्पर्धा व निवड चाचणी घेण्याचे अधिकार दिले आहेत.

या अस्थायी समितीच्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्यासाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच तयारी दर्शविली होती. त्यानुसार शुक्रवारी (9 डिसेंबर) महासंघाच्या वतीने दिल्ली येथे त्यांना अधिकृत पत्र देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा 11 ते 15 जानेवारी दरम्यान कोथरूड येथे होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा असून, दोन्ही संघटनांची दिलजमाई झाल्याचे समजते आहे. भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परीषदेचे काम नवीन कार्यकारिणी पाहाणार आहे. तसेच शरद पवार यांना मुख्य आश्रयदाते म्हणून कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आला आहे, बाळासाहेब लांडगे यांना आश्रयदाते म्हणून परिषदेत सामावून घेण्यात आले आहे.

नगरच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब : आ. जगताप

65वी वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेच्या नियोजनासाठी गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यात नगरच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 25 ते 31 डिसेंबरला वाडिया पार्क क्रीडा मैदानात घुमणार शड्डू घुमणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, खजिनदार सुरेश पाटील, कार्यकारी सदस्य सुभाष ढोणे, राष्ट्रीय पंच, क्रीडा संचालक डॉ. संतोष भुजबळ हे या बैठकीत सहभागी झाले होते.

Back to top button