रोहित शर्मा, दीपक चहर, कुलदीप सेन बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून बाहेर | पुढारी

रोहित शर्मा, दीपक चहर, कुलदीप सेन बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत झालेला भारतीय कर्णधार रोहित शर्मासह दीपक चहर आणि कुलदीप सेन बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात खेळू शकणार नाहीत. कर्णधार रोहित शर्मा हा बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्याला मुकणार असल्याची पुष्टी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने केली आहे. द्रविडने सांगितले की रोहित तिसरा एकदिवसीय सामना खेळणार नाही आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी तो मुंबईला जाईल.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याने क्षेत्ररक्षण केले नाही. त्याच्या जागी केएल राहुलने पदभार स्वीकारला होता. मात्र शेवटी रोहित मैदानात उतरला, त्याने अर्धशतकी खेळी केली. पण त्याच्या खेळीनंतरही संघाला विजय मिळवता आला नाही. रोहित बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार असल्याचे राहुल द्रविडने सांगितले. तसेच ढाका येथील दुसऱ्या वन डे सामन्यात केवळ तीन षटके टाकणाऱ्या दीपक चहरला कुलदीप सेन याच्याप्रमाणेच तिसऱ्या वन डे सामन्यातूनही वगळण्यात आले आहे.

द्रविडने सांगितले की, रोहित पुढचा सामना खेळू शकणार नाही. तो मुंबईला परत जाईल, तज्ञांशी सल्लामसलत करेल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर ढाका येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ तीन षटके टाकणारा दीपक चहरला कुलदीप सेनप्रमाणेच अंतिम एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले आहे. तिघेही पुढचा सामना खेळणार नाहीत.

जखमी रोहित भारतात परतणार

भारत-बांगला देश यांच्यातील दुसर्‍या वन-डे प्रसंगी बुधवारी कर्णधार रोहित शर्मा याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मुंबईला परतणार आहे. या दुखापतीवर आधी तो तज्ज्ञांचे मत घेणार आहे. त्यानंतर तो कसोटी मालिकेसाठी बांगला देशला रवाना होईल किंवा कसे यावर निर्णय होईल.

 

प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याची टीम इंडियाकडून चूक

जिगरबाज बांगला देशने एक दिवशीय मालिकेत भारताला पाणी पाजले. बुधवारच्या दुसर्‍या सामन्यात यजमान संघाने पाहुण्यांना 5 धावांनी पराभूत केले. श्रेयस अय्यर, अष्टपैलू अक्षर पटेल आणि जखमी रोहित शर्मा यांचा अपवाद वगळता भारताच्या सर्वच फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. भारताने सामन्याच्या अंतिम टप्प्यात थोडीफार जिगर दाखवली. तथापि, तोपर्यंत वेळ झाला होता. पाहुण्या संघाला 9 बाद 266 धावांपर्यंतच मजल मारता आली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाहता पाहता भारतावर बाजी उलटवली होती. त्यामुळे आता येत्या रविवारी खेळवण्यात येणारा तिसरा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकता असेल. भारताने बांगलादेशविरुद्ध लागोपाठ दुसरी मालिका अशाप्रकारे गमावली आहे. जिंकण्याची उर्मीच भारतीय संघाने गमावल्याचे या लढतीत दिसून आले. बांगलादेशची फलंदाजी सुरुवातीलाच खिळखिळी केल्यानंतर खरे तर भारताने हा सामना आरामात जिंकायला हवा होता. वास्तवात तसे घडले नाही.

Back to top button