FIFA World Cup 2022 : ब्राझीलकडून अवघ्या ४० मिनिटांत द. कोरियाचा चुराडा

FIFA World Cup 2022 : ब्राझीलकडून अवघ्या ४० मिनिटांत द. कोरियाचा चुराडा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाचवेळच्या चॅम्पियन ब्राझीलने सोमवारी रात्री उशिरा झालेल्या राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 गोलाफरकाने धुव्वा उडवत अक्षरशः चुराडा केला. या दणदणीत विजयासह ब्राझीलने सलग आठव्यांदा आणि एकूण 17 व्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांची पुढची लढत गत उपविजेत्या क्रोएशियाशी होणार आहे.
4-2-3-1 अशा फॉर्मेशनसह मैदानात उतरलेल्या ब्राझीलने पहिल्या हाफच्या 40 मिनिटांतच चार गोल करत सामन्यावर ताबा मिळवला. ब्राझीलच्या आक्रमकतेपुढे 4-4-2 अशा फॉर्मेशनमध्ये खेळणारा द. कोरियाचा संघ पुरता हतबल झाला. त्यांची बाचावफळी गोंधळलेली दिसली. दुसऱ्या हाफच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत त्यांनी स्वतःला दिलासा देणारा गोल केला. मात्र, त्याचा निकालात काहीही फरक पडला नाही.

सामना सुरू झाल्यानंतर सातव्या मिनिटांतच नेमारच्या पासवर विनिशियस ज्युनियरने पहिला गोल केला. त्यांनतर अवघ्या सहा मिनिटांनी ब्राझीलला पेनल्टी मिळाली. दोन सामन्यांत दुखापतीमुळे बाहेर बसलेल्या नेमारने या संधीचे सोने केले. त्याने कोरियन गोलकीपरला चकवत चेंडू सहजरित्या गोलपोस्टमध्ये पाठवला. याचबरोबर त्याने विश्वचषकातील पहिल्या गोलची नोंद केली. यानंतर रिचर्लिसनने (29 मिनिट) तिसरा आणि लुकासने (36 मिनिट) चौथा गोल करून द. कोरियाचे मनोधैर्य खच्ची केले.

दुसऱ्या हाफमध्येही ब्राझीलने आक्रमण सुरूच ठेवले. गोल आघाडी आणखीन वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. सामन्याच्या शेवटच्या 15 मिनिटांत द. कोरियाने धडपडत शेवटचे आक्रमण केले. सलग प्रयत्नांत त्यांना एक यश मिळाले. पाईक सेउंग हो (76 मिनिट) याने संघाचे खाते उघडून ब्राझीलची आघाडी एक गोलने कमी केली. कोरियन चाहत्यांना आता काहीतरी चमत्कार होईल अशी आशा निर्माण झाली, पण ते एक स्वप्नच राहिले. कोरियन संघाच्या एकमेव गोलने निकाल बदलला नाही आणि जगातील नंबर वन ब्राझीलच्या संघाने पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरी गाठली. सामन्यानंतर ब्राझीलच्या खेळाडूंनी हातात बॅनर घेऊन हा विजय फुटबॉलपटू पेले यांना समर्पित केला.

नेमारचा 76 वा गोल

ब्राझीलसाठी नेमारने 76 वा गोल केला. ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. ब्राझीलसाठी पेले यांनी सर्वाधिक 77 गोल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news