विश्वचषक विश्लेषण;: प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील : ग्रुप स्टेजमधील उलटफेरांच्या मालिकेनंतर राऊंड 16 चे सामने आता सुरू झालेले आहेत. हे सामने नक्कीच चुरशीचे होत आहेत. कारण 32 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट 16 संघ राऊंड ऑफ सिक्सटीनसाठी पात्र ठरलेले आहेत. युरोपियन आणि लॅटिन अमेरिकन संघाची आजपर्यंतची फुटबॉल जगतावर असलेली मक्तेदारी मोडीत काढत जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या आशियाई त्याचबरोबर मोरोक्को, सेनेगल या आफ्रिकन आणि अमेरिकेसारख्या नवख्या संघाने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.
या अगोदर आशियाई आणि आफ्रिकन संघांना विश्वचषकासारख्या स्पर्धेत गृहीत धरले जायचे. बाद फेरीत एखादा संघ वगळता सर्व संघ युरोप-लॅटिन अमेरिकन असायचे, पण या स्पर्धेत मात्र जिगरबाज खेळ करत 16 पैकी 6 संघ युरोप आणि दक्षिण अमेरिका वगळता इतर खंडांतील आहेत. फुटबॉलच्या वेगाने होणार्या याच विकासामुळे पुढील विश्वचषकात 32 ऐवजी 48 संघांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय फिफाने घेतला असेल. जागतिक फुटबॉलमध्ये संक्रमणाचा काळ सुरू असून पुढील काही वर्षांमध्ये युरोपियन संघांना आशियाई, आफ्रिकन संघ कडवी टक्कर देतील यात शंकाच नाही. या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या विविध स्पर्धांमध्ये नक्कीच नवीन विजेते पहावयास मिळतील.
राऊंड ऑफ 16 च्या अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू आणि फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारा लियोनल मेस्सी पुन्हा एकदा जागा झाल्यासारखा दिसला. त्याच्यासाठी हा 100 वा सामना होता आणि त्यात गोल करत त्याने हा सामना संस्मरणीय बनवला. वयाच्या 25 व्या वर्षी तो ज्या स्टाईलने होता तोच खेळ त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये केला. मेस्सीसाठी हा नक्कीच शेवटचा विश्वचषक असल्यामुळे तो आणि त्याचा संघ या सामन्यात संपूर्ण ताकतीने खेळताना दिसले. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना मेस्सीचा खेळ बहरत नाही तर बिघडतो अशी अटकळ नेहमीच लावली जाते, पण या सामन्यात त्याने हे सर्व चुकीचे असल्याचे सिद्ध केले. आजच्या सामन्यात तो त्याच्या कामगिरीच्या शिखरावर होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने पहिल्या हाफमध्ये संघासाठी पहिला गोल केला आणि त्यानंतर संपूर्ण सामन्यात संघाला अनेक संधी निर्माण करून दिल्या. पहिल्या हाफमध्ये एक गोलची आघाडी घेऊन अर्जेंटिनाने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. संपूर्ण सामन्यात त्यांनी स्वतःकडे बॉलचे नियंत्रण राखत ऑस्ट्रेलियाला संधी मिळू दिल्या नाहीत. दुसर्या हाफच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलकिपरकडून झालेल्या चुकीचा फायदा उठवत गोल करत अर्जेंटिनाने 2-0 अशी आघाडी घेतली. हा गोल ऑस्ट्रेलियाकडून अर्जेंटिनाला गिफ्ट म्हणून दिला अशा पद्धतीचा होता. अर्जेंटिनाने हाय प्रेसिंग गेम करत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला ज्याचे उत्तर ऑस्ट्रेलियाकडे नव्हते. या सामन्यात अर्जेंटिनाचा संघ अतिशय तुल्यबळ दिसत होता आणि त्यांनी त्याप्रमाणेच प्रशंसनीय खेळ करत 2-1 अशा गोल फरकाने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. सामना जिंकण्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर इमिलानो मार्टिनेज याचा सिंहाचा वाटा होता, कारण सामना संपत असताना आणि इंज्युरी टाईमच्या शेवटच्या मिनिटाला त्याने ऑस्ट्रेलियाची दोन चांगली आक्रमणे परतावून लावली नाहीतर हा सामना कदाचित बरोबरीत सुटला असता आणि एक्स्ट्रा टाईममध्ये गेला असता.
ऑस्ट्रेलियाचा संघ तुलनेने तुल्यबळ नसला तरी त्यांनी या सामन्यात आजपर्यंतचा चांगला खेळ केलेला दिसला. 4-4-2 या फॉर्मेशनने ते मैदानात उतरले, पण अर्जेंटिनाच्या हाय प्रेसिंग गेमचे उत्तर त्यांना शेवटपर्यंत मिळाले नाही. तरीसुद्धा एखाद्या युरोपियन संघाच्या शैलीने खेळताना ते दिसले. दुसरे हाफमध्ये डी बाहेरून मारलेली लाँग किक अर्जेंटिनाच्या डिफेंडरला लागून डिफ्लेक्ट झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची गोल झाली. ऑस्ट्रेलियन गोलकिपरकडून जर चूक झाली नसती आणि अर्जेंटिनाचा दुसरा गोल झाला नसता तर कदाचित हा सामना एक्स्ट्रा टाईम किंवा पेनल्टी स्ट्रोकपर्यंत सुद्धा गेला असता. या सामन्यात दिसलेली अर्जेंटिनाची संघभावना आणि एकी अशीच टिकून राहिली तर ते नक्कीच यशस्वी होतील. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना ऑरेंज आर्मी नेदरलँडबरोबर होईल.
राऊंड ऑफ 16 च्या दुसर्या सामन्यात नेदरलँडने अमेरिकेचा 3-1 गोलने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लुईस वॅन गाल यांच्या 5-3-2 या फॉर्मेशनने खेळणार्या ऑरेंज सेनेने अमेरिकेला कोणतीही संधी न देता या सामन्यात विजय मिळवला. प्रथमच बाद फेरीत प्रवेश केलेल्या अमेरिकेसारख्या नवख्या संघाला बाद फेरीत बलाढ्य संघाविरोधात खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे यश मिळाले नाही, असे म्हणता येईल. साखळी फेरीप्रमाणे अमेरिकेचा खेळ या सामन्यात झाला नाही. साखळी सामन्यातून मिळत आलेला आत्मविश्वास या सामन्यात दिसला नाही. आक्रमणात फायनल थर्डमध्ये मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अमेरिकेला अपयश आले. क्रिस्टियन पोलिसिक वगळता अमेरिकेकडे मोठे टॅलेंट नव्हते. पहिल्या हाफमध्ये दोन गोलने पिछाडीवर असल्यामुळे दुसर्या हाफची सुरुवात अमेरिकेने आक्रमक केली. यामध्ये त्यांना एक गोल करण्यात यश आले, पण 81 व्या मिनिटाला नेदरलँडकडून तिसरा गोल झाला आणि अमेरिकेच्या या विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला. नेदरलँडने जरी या सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांच्या संघाची लय अमेरिकेसारखा नवोदित संघ बिघडवू शकत असेल तर बलाढ्य संघांबरोबर त्यांचा कितपत टिकाव लागेल हा नेदरलँड प्रशिक्षकांसमोर मोठा प्रश्न असेल.