FIFA WC 2022 : बेल्जियमचे स्वप्न भंगले, क्रोएशियाने दाखवला बाहेरचा रस्ता | पुढारी

FIFA WC 2022 : बेल्जियमचे स्वप्न भंगले, क्रोएशियाने दाखवला बाहेरचा रस्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला बेल्जियम कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकातून बाद होण्याची नामुष्की ओढवली. गुरुवारी ‘ग्रुप एफ’मधील झालेल्या सामन्यात क्रोएशियाने 0-0 असे बरोबरीत रोखून दिग्गज बेल्जियला बाहेरचा रस्ता दाखवला.

सामन्याच्या सुरूवातीपासून बेल्जियम-क्रोएशियाने आक्रमक पवित्रा घेत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. सामन्यात बेल्जियम संघाने क्रोएशियाच्या गोलपोस्टवर 16 शॉट मारले. त्यापैकी 3 शॉट टार्गेटवर होते. तर, क्रोएशियाने बेल्जियमच्या गोलपोस्टवर एकूण 11 शॉट मारले. त्यापैकी 4 शॉट टार्गेटवर होते. इतके प्रयत्न करूनही दोन्ही संघाची पाटी कोरीच राहिली. (FIFA WC 2022)

सामन्यातीच्या दुसऱ्या हाफमध्ये ही दोन्ही संघांनी गोल करण्याच्या इराद्याने अनेक आक्रमणे केली. परंतु दोन्ही संघाच्या बचावपटूंनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफमध्ये बेल्जियम संघाने आक्रमण वाढवण्यासाठी अनुभवी लुकाकूला मैदानात उतरवले. परुंतु तो देखील सामन्यात संघासाठी गोल करण्यात करण्यात अपयशी ठरला. त्याला रोखण्यात क्रोएशियाच्या बचावपटूनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यात कोणत्याही संघाला गोल करता न आल्यामुळे सामना 0-0 असा बरोबरीत सुटला.

बेल्जियमला स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. पण क्रोएशियाने भक्कम बचाव करून बेल्जियमला शुन्य गोल बरोबरीत ठेवले.

क्रोएशियाला मिळाली पेनल्टी, पण…

सामन्याच्या 15 व्या मिनिटाला क्रोएशियाला पेनल्टी मिळाली. बेल्जियमच्या कॅरास्कोने पेनल्टी बॉक्समध्ये क्रोएशियन स्ट्रायकर क्रेमेरिजला खाली पाडले. रेफ्रींनी क्रोएशियन संघाला पेनल्टी बहाल केली. लुका मॉड्रिच पेनल्टी घेण्यास तयार होता, पण व्हीएआरने निर्णय उलटवला. क्रोएशियाचा एक खेळाडू ऑफसाईड सापडला. त्यामुळे क्रोएशिया या संधीपासून मुकले.

Back to top button