

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेत आणखी एक अपसेट पाहायला मिळाला आहे. 61व्या क्रमांकाच्या घाना संघाने 28व्या क्रमांकाच्या दक्षिण कोरिया संघाचा 3-2 असा पराभव केला. घानाचा संघ कोरियन संघावर वरचढ ठरला. या विजयासह राउंड ऑफ 16 ची फेरी गाठण्याच्या घानाच्या आशा कायम आहेत. त्याचवेळी कोरियन संघाचा मार्ग खडतर झाला आहे.
घानाने महत्त्वपूर्ण सामन्यात शानदार सुरुवात केली. पहिल्या हाफच्या 24 व्या मिनिटाला मोहम्मद सलिसूने गोल करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर घानाने आपल्या खेळाचा वेग आणखीन वाढला आणि 34 व्या मिनिटाला दुसरा गोल करून आघाडी दुप्पट केली. जॉर्डन आय्यूच्या शानदार पासवर मोहम्मद कुदुसने अचूक हेडरवर गोलजाळे भेदले. याबरोबरच 2006 च्या विश्वचषकानंतर प्रथमच घाना सलग दोन विश्वचषक सामन्यांमध्ये दोन गोल करण्यात यशस्वी ठरला. पहिला हाफ टाईम संपला तेव्हा घानाची ही आघाडी कायम राहिली. दुसरीकडे कोरियाने 13 वेळा गोल करण्याची संधी मिळाली पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
दुस-या हाफमध्ये कोरियन संघाने जबरदस्त पुनरागमन केले. संघाने तीन मिनिटांत दोन गोल करून बरोबरी साधली. कोरियाचे दोन्ही गोल चो ग्युसुंगने हेडरद्वारे 58व्या आणि 61व्या मिनिटाला केले. यानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा चुरशी स्पर्धा सुरू झाली. पण यात घानाने बाजी मारली. मोहम्मद कुदुसने 68 व्या मिनिटाला संघासाठी तिसरा आणि सामन्यातील वैयक्तीक दुसरा गोल नोंदवला. या गोलच्या जोरावर घानाची आघाडी 3-2 अशी वाढली, जी सामना संपेपर्यंत कायम राहिली. विश्वचषकात पहिल्यांदाच घानाने एका सामन्यात तीन गोल केले. 22 वर्षे 118 दिवसांच्या वयात कुडूस विश्वचषकाच्या एकाच सामन्यात गोल करणारा दुसरा सर्वात तरुण आफ्रिकन खेळाडू ठरला. यापूर्वी 2014 विश्वचषकात नायजेरियाच्या अहमद मुसाने अर्जेंटिनाविरुद्ध दोन गोल केले होते. तेव्हा मोशे 21 वर्षे 254 दिवसांचा होता.
सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत कोरियन संघाने अनेक हल्ले चढवले, पण घानाच्या बचावपटूंनी त्यांना गोल करू दिला नाही. या सामन्यात कोरियन संघाने गोलवर 22 शॉट्स मारले. मात्र, त्यांचे सात फटके निशाण्यावर होते. यापैकी दोनमध्ये कोरियन संघ गोल करू शकला. 2002 नंतर प्रथमच कोरियन संघ विश्वचषकाच्या सामन्यात इतके शॉट्स मारण्याचा प्रयत्न करू शकला आहे. 2002 च्या विश्वचषकात द. कोरिया तुर्कीविरुद्ध 23 शॉट्स मारले होते. कोरियाचा चेंडूवर ताबा 64 टक्के होता. त्याच वेळी, घानाने सात शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी तीनमध्ये ते आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी झाले. घानाचा चेंडूवर ताबा 36 टक्के होता.
सामन्याच्या शेवटी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वास्तविक, 90 मिनिटांनंतर 10 मिनिटांचा इंज्युरी टाईम देण्यात आला. या वेळेत शेवटच्या काही क्षणांत कोरियन संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण रेफ्रींनी सामना संपल्याचे घोषित केले. यावेळी कोरियन प्रशिक्षक पाउलो व्हेंटो मैदानात आले आणि त्यांनी रेफरींचा निषेध केला. यासोबतच कोरियन खेळाडूंनीही त्याला साथ दिली. यावर रेफरींनी प्रशिक्षक व्हेंटो यांना रेड कार्ड दाखवले. आता पुढच्या सामन्यात ते कोरियाला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर उपस्थित राहू शकणार नाहीत.
कोरिया रिपब्लिकने पहिल्या सामन्यात उरुग्वेला रोखत सामन्यात बरोबरी साधली होती. त्याचवेळी घानाला पोर्तुगालकडून 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत राउंड ऑफ 16 च्या लढाईत टिकून राहण्यासाठी घानाच्या संघाला विजय मिळणे आवश्यक होते. ते यश त्यांनी त्यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर मिळवले. त्याचबरोबर प्री-क्वार्टर फायनलसाठी त्यांनी आपला दावा मजबूत केला आहे.