फिफा वर्ल्डकप : नवख्या अमेरिकेने बलाढ्य इंग्लंडला बरोबरीत रोखले | पुढारी

फिफा वर्ल्डकप : नवख्या अमेरिकेने बलाढ्य इंग्लंडला बरोबरीत रोखले

       विश्वचषक विश्लेषण

  •  प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

ग्रुप ‘बी’मधील इंग्लंड विरुद्ध अमेरिका हा सामना गोल शून्य बरोबरीत सुटला. इंग्लंडसाठी हा ग्रुप अतिशय सोपा असला तरी त्यांना बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन विजय आवश्यक आहेत. या सामन्यात विजय मिळवला असता तर इंग्लंडचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला असता. पण अमेरिकेने इंग्लंडचे सारे मनसुबे धुळीस मिळवले. स्पर्धेच्या सुरुवातीला इराणवर मोठ्या गोल फरकाने विजय मिळवत इंग्लंडने चांगली सुरुवात केलेली होती. या सामन्यातसुद्धा इंग्लंडचा संघ अमेरिकेच्या तुलनेत तुल्यबळ वाटत होता. पण युवा अमेरिकन संघाने इंग्लंडला चांगली लढत देत सामना बरोबरीत सोडवण्यास भाग पाडले. या सामन्यात सर्वांच्या नजरा इंग्लंडचा बुकाय साका आणि अमेरिकेचा टीम विह या दोन प्रतिभावान युवा खेळाडूंवर होत्या. पण हे दोन्ही खेळाडू या सामन्यात गोल करण्यात अपयशी ठरले.

इंग्लंड संघाने 4-3-3 या फॉर्मेशनने सामन्यामध्ये चांगली सुरुवात केली होती. सामन्यामध्ये चेंडूवर नियंत्रण राखत आक्रमक चाली रचणे ही इंग्लंडची नेहमीची शैली आहे. या सामन्यामध्ये सुद्धा याच शैलीचा वापर त्यांनी केला. शॉर्ट पासिंगद्वारे चांगल्या चाली रचत सुरुवातीपासून अमेरिकन बचावफळीवर दबाव निर्माण केला होता. नवव्या मिनिटाला उजव्या बाजूने झालेल्या आक्रमणात इंग्लंडला चांगली संधी मिळाली होती. पण माऊंटला हा बॉल गोल पोस्टमध्ये धाडण्यात अपयश आले. संपूर्ण वेळेत सामना गोल शून्य बरोबरीत सुटला असला तरी इंग्लंडला काही चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण फिनिशिंगमध्ये त्यांना अपयश आले. 90 व्या मिनिटाला मोठा डी बाहेर इंग्लंडला मिळालेल्या फ्री किकद्वारे गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती. पण डाव्या बाजूने आलेल्या क्रॉसवर संघाचा कर्णधार हॅरी केन याने हेडने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला. हॅरी केनच्या दर्जाचा आणि कामगिरीचा विचार करता हा गोल न होणे प्रेक्षकांबरोबरच स्वत: हॅरी केनसाठीसुद्धा आश्चर्यजनक होते. हॅरी केनला इंग्लंडच्या संघाचा गोल मशिन म्हटले जाते. पण या स्पर्धेमध्ये त्याला अद्याप गोलचे खाते उघडता आलेले नाही, ही इंग्लंडसाठी चिंतेची बाब आहे. सामन्यानंतर इंग्लंडचे प्रशिक्षक गेराथ साऊथगेट यांनी आपली नाराजी दर्शवत फायनल थर्डमध्ये असलेल्या कमतरतेमुळे गोल करण्यात इंग्लंडचे खेळाडू अपयशी ठरत आहेत, असे सांगितले. तसेच इंग्लंडच्या बचावफळीतील उणिवाबद्दल चिंता व्यक्त केली.

दुसर्‍या बाजूला अमेरिकेच्या युवा संघाने 4-3-3 या फॉर्मेशनचा वापर करत इंग्लंडला चांगली लढत दिली. अमेरिकेचा संघ टॅक्टिकल फुटबॉल खेळण्यावर भर देतो. हा संघ अतिशय प्रतिभावान आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघात प्रतिभेची कोणतीच कमतरता नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संघांच्या विरोधात चांगली कामगिरी करायची झाल्यास अनुभव महत्त्वाचा ठरतो. गेल्या दहा वर्षांत अमेरिकेमध्ये फुटबॉल चांगल्या प्रकारे विकसित झालेला आहे. पण अमेरिकेचे खेळाडू युरोपमधील क्लब स्तरावरील फुटबॉल अतिशय कमी खेळतात. त्यामुळे इंग्लंडसारख्या युरोपियन देशाबरोबर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाही हे सामन्यादरम्यान स्पष्ट जाणवत होते. अमेरिकन संघाने त्यांच्या शैलीप्रमाणे खेळ करत सामन्यादरम्यान चांगली परिपक्वता दाखवली. एखाद्या बलाढ्य संघास रोखायचे झाल्यास फक्त टॅक्टिकल फुटबॉलवर भर न देता त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार कसा खेळ करावा हे त्यांनी दाखवून दिले.

संपूर्ण सामन्यात अमेरिकेच्या बचाव फळीने अतिशय चांगली कामगिरी केली. पहिल्या हाफच्या मध्यात इंग्लंडला दोन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण अमेरिकेच्या बचावफळीने या संधीचे रूपांतर गोलमध्ये होऊ दिले नाही. या सामन्यात अमेरिकन संघ गोल करण्यात अपयशी झाला असला तरी त्यांच्या आक्रमक फळीने काही चांगली आक्रमणे रचत इंग्लंडला अडचणीत आणले होते. त्यामुळे या सामन्याचा विचार करता अमेरिका संघाने सांघिक खेळ करत बलाढ्य संघांबरोबर ते चांगली लढत देऊ शकतात, हे सिद्ध केलेले आहे. जर अमेरिकेने बाद फेरीत प्रवेश केला तर ते या स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवू शकतात. सामन्यानंतर अमेरिकेच्या प्रशिक्षकांनी आम्ही आत्मविश्वासाने या स्पर्धेत पुढे वाटचाल करत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.

एकंदर ग्रुपचा विचार केल्यास इंग्लंडबरोबर हा सामना बरोबर ठेवल्यामुळे अमेरिकेला बाद फेरीत पोचण्यासाठी आता चांगली संधी आहे. अमेरिकेचे दोन सामन्यातून दोन गुण झालेले आहेत. त्यांचा तिसरा सामना इराणबरोबर आहे. हा सामना अमेरिकेने जिंकल्यास त्यांना बाद फेरी आरामात गाठता येईल. कारण या गटातील वेल्सचा तिसरा सामना इंग्लंडबरोबर आहे. हा सामना वेल्ससाठी नक्कीच सोपा नाही. त्यामुळे अमेरिकेसाठी ही चांगली संधी आहे. इंग्लंडने पहिला सामना जिंकत आणि अमेरिकेबरोबरचा सामना बरोबरीत राहिल्यामुळे एकूण चार गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांचा बाद फेरीतील प्रवेश अजून निश्चित नसला तरी वेल्सबरोबरचा सामना बरोबरीत सोडवल्यास ते पुढे जाऊ शकतात. याच गटातील दुसर्‍या सामन्यात आशियाई संघ इराणने वेल्सचा दोन शून्य गोलने अनपेक्षित पराभव करत तीन गुणांची कमाई केली.

Back to top button