वेध विश्वचषकाचे : फिफा वर्ल्डकप 2022 कतार

वेध विश्वचषकाचे : फिफा वर्ल्डकप 2022 कतार
Published on
Updated on
  •   प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

 ग्रुप 'एच'

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या आठव्या गटात म्हणजेच ग्रुप 'एच'मध्ये पोर्तुगाल, घाना, उरुग्वे आणि साऊथ कोरिया या वेगवेगळ्या खंडातील संघांचा समावेश आहे. यातील पोर्तुगाल आणि उरुग्वे हे दोन संघ तुल्यबळ आहेत. पण साऊथ कोरिया आणि घाना या दोन संघांना कमी लेखून चालणार नाही. पोर्तुगाल संघाला विश्वचषक स्पर्धेचे विSportsजेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे यावर्षी ते त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करतील.

                                               1. पोर्तुगाल

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेला हा संघ अद्याप विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला आहे. संघामध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोसारखा स्टार प्लेयरअसून सुद्धा 2016 चा युरो चषक वगळता मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या विश्वचषकासाठी पोर्तुगालने अतिशय चांगली संघ बांधणी केलेली आहे.

बलस्थान : या संघामध्ये रोनाल्डो आणि पेपे वगळता नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. प्रशिक्षकांच्या रणनीतीप्रमाणे संघाचा पवित्रा बचावात्मक असला तरी योग्य वेळी जलद आणि सर्जनशील फुटबॉल खेळण्यात हा संघ पटाईत आहे. या संघामध्ये अनेक नवोदित प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे.

कच्चे दुवे : 2016 च्या युरो विजेतेपदानंतर गेल्या काही वर्षांत या संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक झालेली आहे. 37 वर्षीय रोनाल्डो त्याच्या प्रतिभेनुसार खेळ करण्यात अपयशी ठरलेला आहे. त्याचा परिणाम संघाच्या मानसिकतेवर आणि आत्मविश्वासावर होत आहे.

कामगिरीचा अंदाज : हा संघ बाद फेरीत आरामात प्रवेश करेल. सर्व खेळाडूंनी त्यांच्या प्रतिभेनुसार खेळ केल्यास उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचण्यास या संघास कोणतीच अडचण येणार नाही.

                                               2. घाना

जागतिक क्रमवारीत 61 व्या स्थानावर असलेला हा आफ्रिकन संघ मागच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता. पण यावेळी पात्रता फेरीमध्ये चांगली कामगिरी करत या संघाने विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवले. या स्पर्धेत या संघाकडून मोठ्या अपेक्षा नसल्या तरी गटातील संघांबरोबर टक्कर देण्याचे आव्हान मात्र नक्कीच असेल.

बलस्थान : मध्य फळी या संघाचा कणा आहे. मध्य फळीतील खेळाडू सामन्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. सध्या हा संघ जास्तीत जास्त टेक्निकल आणि टॅक्टिकल फुटबॉल खेळण्यावर भर देत आहे. संघाच्या गरजेप्रमाणे फॉर्मेशनमध्ये आणि शैलीमध्ये बदल करून त्याप्रमाणे खेळ करण्याची क्षमता या संघामध्ये आहे.

कच्चे दुवे : पारंपरिक पद्धतीची सवय असणार्‍या या संघास टॅक्टिकल फुटबॉल खेळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे खेळाडूंची तंदुरुस्ती टिकवणे हे संघासमोरील मोठे आव्हान असणार आहे.
कामगिरीचा अंदाज : पोर्तुगाल आणि उरुग्वे यासारख्या बलाढ्य संघांना टक्कर देण्याचे मुख्य आव्हान या संघासमोर असेल. बाद फेरीसाठी हा संघ पात्र ठरेल असे वाटत नाही.

                                                    3. उरुग्वे

जागतिक क्रमवारीत चौदाव्या स्थानावर असलेल्या या संघाने गेल्या विश्वचषकात क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. दोन वेळचा विश्वविजेता असलेल्या या संघाची सर्व भिस्त लुईस सोरेज, एडिसन कवानी यांसारख्या अनुभवी खेळाडूंवर अवलंबून असेल. प्रत्येक सामन्याप्रमाणे नवीन रणनीती तयार करून त्याप्रमाणे खेळण्यात हा संघ पटाईत आहे.

बलस्थान : प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे, त्याप्रमाणे प्रत्येक वेळी वेगवेगळे फॉर्मेशन वापरून त्याप्रमाणे खेळण्यावर हा संघ भर देतो. संपूर्ण स्पर्धेचा विचार न करता सामन्यागणिक विचार करून त्याप्रमाणे ते रणनीती आखतात. या संघाची आक्रमक फळी अनुभवी आणि दर्जेदार आहे. त्यामुळे गोलच्या अनेक संधी निर्माण होतात.

कच्चे दुवे : काही महत्त्वाचे खेळाडू जखमी असल्यामुळे अद्याप स्टार्टिंग लाईनअप ठरलेली नाही. त्यामुळे या खेळाडूंना बाहेर ठेवून अंतिम अकरा खेळाडूंची निवड करण्याचे आव्हान प्रशिक्षकांसमोर आहे.

कामगिरीचा अंदाज : हा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल, असा अंदाज आहे. पण दक्षिण कोरियाबरोबर त्यांचा होणारा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचण्याची क्षमता या संघामध्ये आहे.

                                                 4. द. कोरिया

जागतिक क्रमवारीत 28 व्या स्थानावर असलेला हा आशियाई संघ गेल्या विश्वचषक स्पर्धेत चमकला होता. जर्मनीसारख्या बलाढ्य संघास पराभूत करण्याची किमया त्यांनी केली होती. विश्वचषकातील त्यांची कामगिरी तितकी चांगली नसली तरी एखादा धक्कादायक निकाल लावण्याची क्षमता या संघात नक्कीच आहे.

बलस्थान : त्यांच्या 'हाय ओक्टेन' पद्धतीमुळे ते प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याच्या जास्त संधी देत नाहीत. तसेच खोलवर आक्रमणे करण्यात हा संघ भर देतो. गेल्या काही वर्षांत या संघात अनेक दर्जेदार खेळाडूंचा समावेश झालेला आहे, जे विविध देशांत क्लब स्तरावरील फुटबॉल खेळत आहेत.

कच्चे दुवे : काही महत्त्वाच्या खेळाडूंवर हा संघ अवलंबून असल्यामुळे हेच खेळाडू जायबंदी झाल्यास त्याचा परिणाम संघाच्या मानसिकतेवर होऊ शकतो. शारीरिक मर्यादांमुळे ते युरोपियन संघासमोर थोडेसे डावे ठरतात.

कामगिरीचा अंदाज : या गटात दक्षिण कोरियाला पोर्तुगीज आणि उरुग्वे या दोन संघांबरोबर चांगली टक्कर द्यावी लागेल. तरच बाद फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा शिल्लक राहतील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news