आयपीएल : सर्व संघांना ‘प्ले ऑफ’ची संधी

आयपीएल : सर्व संघांना ‘प्ले ऑफ’ची संधी
Published on
Updated on

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : 'आयपीएल -14'च्या सत्राचे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात येणार आहेत. कोरोना संकटामुळे 3 मे रोजी आयपीएल चे हे सत्र स्थगित करण्यापूर्वी एकूण 29 सामने खेळविण्यात आले आहेत. आठपैकी सहा सामने जिंकून दिल्ली कॅपिटल्स गुणतक्त्यात पहिल्या स्थानी आहे.

या संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने 134.27 च्या सरासरीने सर्वाधिक 380 धावा काढल्या आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या हर्षल पटेल याने सात सामन्यांत सर्वाधिक 17 विकेटस् घेतल्या आहेत.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर जगभरात लोकप्रिय ठरलेली ही टी- 20 लीग पुन्हा सुरू होईल, तेव्हा सर्वकाही बदललेले असेल. सर्व संघ भारतात नव्हे तर संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळताना दिसतील. काही संघांचे स्वरूपही बदललेले असेल. सर्वात जास्त बदल कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळूर संघात पहावयास मिळणार आहे. तर, राजस्थान, पंजाब आणि कोलकाता संघातही काही नवे खेळाडू खेळताना पहावयास मिळणार आहेत.

सध्याची स्थिती पाहता सर्वच्या सर्व आठ संघांना 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी दिल्ली आणि पंजाबने आपापले प्रत्येकी आठ सामने खेळले आहेत. तर, उर्वरित संघांचे प्रत्येकी 7-7 सामने झालेले आहेत. 6 सामने जिंकून दिल्ली प्रथम स्थानी आहे. तर चेन्नई व बंगळूरने प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत.

तसेच चार सामने जिंकून मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय राजस्थान व पंजाबने प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहे. तर कोलकाता 7 व्या व हैदराबाद आठव्या स्थानी आहेत. संघांची विद्यमान स्थिती आणि ते कसे अंतिम चार संघात पोहोचू शकतील, ते खालीलप्रमाणे

दिल्ली कॅपिटल्स : आठ सामने खेळून संघ अव्वलस्थानी आहे. या संघाने पंजाबविरुद्ध दोन्ही सामने खेळले आहेत. तर उर्वरित संघांविरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळावयाचा बाकी आहे.

अंतिम चारचा मार्ग : उर्वरित सहापैकी तीन सामने जिंकल्यास संघ अंतिम चारमध्ये पोहोचू शकतो.

चेन्नई सुपर किंग्ज : सातपैकी पाच सामने जिंकून संघ दुसर्‍या स्थानी आहे. या संघाचे व बंगळूरचे समान 10 गुण आहेत. मात्र, चेन्नईचा रनरेट बंगळूरपेक्षा सरस आहे. याचा लाभ कदाचित चेन्नईला मिळू शकतो.

अंतिम चारचा मार्ग : उर्वरित सातपैकी चार सामने जिंकावे लागणार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : सातपैकी पाच सामने जिंकून संघ तिसर्‍या स्थानी आहे. या संघाचे व चेन्नईचे समान 10 गुण आहेत. मात्र, बंगळूरला रनरेट सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल.

अंतिम चारचा मार्ग : उर्वरित सातपैकी चार सामने जिंकल्यास संघ अंतिम चारमध्ये पोहोचू शकतो.

मुंबई इंडियन्स : सातपैकी चार सामने जिंकून संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. गुणतक्त्यात चौथ्या स्थानी असला तरी मुंबईचा रनरेट मात्र तिसर्‍या स्थानावरील बंगळूरपेक्षाही सरस आहे.

अंतिम चारचा मार्ग : उर्वरित सातपैकी चार सामने जिंकल्यास संघ अंतिम चारमध्ये पोहोचू शकतो.

राजस्थान रॉयल्स : सातपैकी तीन सामने जिंकून संघ गुणतक्त्यात पाचव्या स्थानी आहे. या संघाचा रनरेटही मायनसमध्ये आहे. यामुळे उर्वरित सामन्यात या संघाला कामगिरी सुधारावी लागणार आहे.

अंतिम चारचा मार्ग : बटलर, स्टोक्स, आर्चरशिवाय संघाला 5 विजय मिळवावे लागतील.

पंजाब किंग्ज : संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. सहा गुणांसह हा संघ सहाव्या स्थानी आहे. त्यांचा रनरेट राजस्थानपेक्षाही कमी आहे. कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

अंतिम चारचा मार्ग : उर्वरित 6 पैकी पाच सामने जिंकावे लागतील. याशिवाय रनरेटही सुधारावा लागेल.

कोलकाता नाईट रायडर्स : या संघाने सातपैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. मुख्य गोलंदाज कमिन्स नसल्याने संघाच्या गोलंदाजीच्या समस्या वाढणार आहेत.

अंतिम चारचा मार्ग : उर्वरित सात पैकी सहा सामने जिंकावे लागतील. याशिवाय रनरेटही सुधारल्यास 'प्ले ऑफ'ची संधी मिळू शकते.

सनरायझर्स हैदराबाद : गुणतक्त्यात हा संघ सध्या शेवटच्या स्थानी आहे. संघाने सत्रात आतापर्यंत सातपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. कर्णधारही बदलला आहे.

अंतिम चारचा मार्ग : अंतिम अकरा खेळाडूंची निवड आव्हानात्मक आहे. सर्व सात सामने जिंकल्यास 'प्ले ऑफ'ची संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news