Fifa WorldCup : फुटबॉल विश्वयुद्धाचा थरार आजपासून

Fifa WorldCup : फुटबॉल विश्वयुद्धाचा थरार आजपासून

Fifa WorldCup : दोहा, वृत्तसंस्था : जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून (20 नोव्हेंबरपासून) कतारमध्ये सुरुवात होत आहे. 18 डिसेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या आखाती देशात आयोजित केला जात आहे. तसेच फिफा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 देशांचे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात रविवारी रात्री 9.30 वाजता (भारतीय वेळेनुसार) दोहा येथील अल बायत स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यापूर्वी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात कोलंबियन पॉपस्टार शकिरा आणि भारतीय अभिनेत्री नोरा फतेेही थिरकणार आहेत.

Fifa WorldCup : उद्घाटन सोहळा

रविवारी यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल. हा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. उद्घाटन समारंभ दोहाच्या उत्तरेस 40 कि.मी. अंतरावर असलेल्या 60,000 क्षमतेच्या अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे.

Fifa WorldCup : कुठे पाहणार हा सोहळा?

फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा भारतातील टीव्हीवर स्पोर्टस् 18 आणि स्पोर्टस् 18 एचडीवर प्रसारित केला जाईल. जिओ सिनेमा अ‍ॅप आणि त्याच्या वेबसाईटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील असेल.

Fifa WorldCup : भारताचे उपराष्ट्रपतीही सहभागी होणार

कतार येथे रविवारी होणार्‍या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपाध्यक्ष जगदीप धनकड उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या निमंत्रणावरून धनकड 20-21 नोव्हेंबर रोजी कतारला भेट देतील. फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, उपराष्ट्रपती त्यांच्या भेटीदरम्यान भारतीय समुदायाच्या सदस्यांनादेखील भेटतील.

Fifa WorldCup : फिफा विश्वचषक चॅम्पियनला 26 पट अधिक बक्षीस रक्कम

क्रिकेट आणि फुटबॉल विश्वचषक जिंकणार्‍या दोन्ही संघांना किती पैसे मिळतात हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. याबद्दल महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही विश्वचषकांच्या चॅम्पियन संघाला मिळालेल्या बक्षीस रकमेत जवळपास 26 पट फरक आहे. म्हणजेच फिफा विश्वचषक विजेत्या संघाला मिळणारी रक्कम ही टी-20 विश्वचषक जिंकणार्‍या संघापेक्षा तब्बल 26 पट अधिक असणार आहे. आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण 45.14 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम निश्चित केली होती. ती सर्व 16 संघांमध्ये वेगळ्या पद्धतीने वाटली गेली. अंतिम फेरीच्या चॅम्पियन संघाला सुमारे 13 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला सुमारे 6.44 कोटी रुपये मिळाले. फिफा विश्वचषक स्पर्धेत मात्र बक्षीस म्हणून तब्बल 3,585 कोटी रुपयांचे इनाम असणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news