NZ v IND | पावसामुळे भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना रद्द, पण खेळाडूंनी खेळला फूटव्हॉलीचा सामना (व्हिडिओ) | पुढारी

NZ v IND | पावसामुळे भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना रद्द, पण खेळाडूंनी खेळला फूटव्हॉलीचा सामना (व्हिडिओ)

वेलिंग्टन; पुढारी ऑनलाईन : भारत आणि न्यूझीलंड (NZ v IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज शुक्रवारी पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांमध्ये आज (१८ नोव्हेंबर) पासून (शुक्रवार) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार होती. पण आजच्या वेलिंग्टनमधील सामन्यावर संकटचे ढग दाटले आणि पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता न्यूझीलंडच्या हवामान विभागाने वर्तवली होती. या अहवालानुसार दुपारी आणि संध्याकाळी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. ढगाळ वातावरण राहून जोरदार वार्‍यासह तापमान १४ अंशांपर्यंत पोहोचू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अंदाज खरा ठरला आणि नाणेफेक होण्याच्या आधीपासून पावसाने सुरुवात केली. पावसाची संततधार न थांबल्याने एक चेंडूही न खेळता हा सामना रद्द केला असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

दरम्यान, टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघ पाऊस थांबण्याची वाट पाहत असताना दोन्ही संघांनी फूटव्हॉलीचा आनंद घेतला. त्यांनी हा खेळ इनडोअर जागेत खेळला. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

न्यूझीलंड दौर्‍यावर अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करत असून ऋषभ पंत उपकर्णधार आहे. या न्यूझीलंड दौर्‍यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना पाठवण्यात आले नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत युवा खेळाडूंना या दौर्‍यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. (NZ v IND)

Back to top button