कोहलीच्या पाकिस्तानविरुद्ध खेळीला आयसीसीचा सलाम | पुढारी

कोहलीच्या पाकिस्तानविरुद्ध खेळीला आयसीसीचा सलाम

मेलबर्न : 2022 च्या टी-20 विश्वचषकाचा किताब भलेही इंग्लिश संघाने पटकावला, मात्र भारताच्या किंग कोहलीने शानदार खेळी करून वर्चस्व गाजवले. त्याने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या मॅचविनिंग खेळीचा आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळींच्या यादीत समावेश केला आहे.

विराट कोहलीसाठी टी-20 विश्वचषक 2022 खास ठरला. या विश्वचषकात त्याने सर्वाधिक 296 धावा केल्या. यामध्ये 4 अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. मात्र उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. आयसीसीने विश्वचषकातील 10 सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद 82 धावांच्या खेळीचाही समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांवर 4 बळी गमावले होते. लक्षणीय बाब म्हणजे भारताला शेवटच्या 8 चेंडूत 28 धावा करायच्या होत्या.

विराट कोहलीने सलामीच्या सामन्यातील 19व्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर हारिस रौफला 2 षटकार ठोकले होते. अखेरच्या षटकात भारताला 16 धावा करायच्या होत्या. कोहलीने मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकला. आर अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.

Back to top button