Kieron Pollard Retired : पोलार्डची IPL मधून निवृत्ती, मुंबई इंडियन्स देणार नवी जबाबदारी | पुढारी

Kieron Pollard Retired : पोलार्डची IPL मधून निवृत्ती, मुंबई इंडियन्स देणार नवी जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची रिटेन्शन लिस्ट समोर येण्यापूर्वीच मोठा धमाका झाला आहे. आयपीएलमधील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या कायरन पोलार्डने (Kieron Pollard Retired) या स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. तो यापुढे IPL मध्ये खेळताना दिसणार नाही. 13 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणारा पोलार्ड आता संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनला आहे.

कायरन पोलार्डने (Kieron Pollard Retired) त्याच्या ट्विटर अकाऊंटवर निवृत्तीशी संबंधित माहिती दिली आहे. पोलार्ड म्हणतो की, माझ्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता. पण मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी दीर्घ चर्चा केल्यानंतर मी यापुढे आयपीएलमध्ये खेळणार नाही, असा निष्कर्ष काढला. जर मला मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) खेळता येत नसेल तर मी इतर कोणत्याही संघातून खेळणार नाही. कारण मी मुंबई इंडियन्स विरुद्ध स्वत:ला पाहू शकत नाही. एमआयने बरेच काही साध्य केले आहे आणि आता ते बदलाच्या काळातून जात आहेत. हा भावनिक निरोप नाही कारण मी मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारले आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील एक दिग्गज खेळाडू म्हणून किरॉन पोलार्डकडे (Kieron Pollard Retired) पाहिले जाते. तो सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग राहिला आहे. पोलार्डने 2010 मध्ये दिल्ली संघाविरुद्ध पदार्पण केले होते, तर 2022 मध्ये कोलकाता संघाविरुद्ध शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.

मुंबई इंडियन्सने पोलार्डला कायम ठेवले नाही..

यंदाच्या आयपीएलमध्ये शेवटच्या स्थानावर गेलेल्या मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना डच्चू दिला. तर 10 खेळाडूंना कायम ठेवले. रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा हे पुढील सीझनमध्ये पुन्हा एमआय संघात खेळताना दिसतील. तर त्याचवेळी फॅबियन अॅलन, कायरन पोलार्ड, टायमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि हृतिक शोकिन यांना रिलीज करण्यात आले.

आयपीएल रेकॉर्ड पाहता त्याने एकूण 189 आयपीएल सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 16 अर्धशतकांसह 3412 धावा केल्या. पोलार्डच्या (Kieron Pollard) नावावर आयपीएलमध्ये (IPL 2023) एकूण 223 षटकार आहेत, तर गोलंदाजीतही त्याने कमाल केली आणि एकूण 69 विकेट घेतल्या. यामुळेच आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये कायरन पोलार्डची गणना होते.

कधी बॅटने तर कधी चेंडूने आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या किरॉन पोलार्डने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना, किरॉन पोलार्ड 2013, 2015, 2017, 2019, 2020 च्या चॅम्पियन संघाचा भाग होता. तसेच, 2011 आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या संघाचा तो एक भाग होता.

पोलार्ड हा आयपीएल फायनलचा बादशहा

• 2010 फायनल – 10 चेंडूत 27 धावा
• 2013 फायनल – 32 चेंडूत 60 धावा
• 2015 फायनल – 18 चेंडूत 36 धावा
• 2019 फायनल – 25 चेंडूत 41 धावा

Back to top button