राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; अचंताला ‘खेलरत्न’, दिनेश लाड यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार | पुढारी

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; अचंताला ‘खेलरत्न’, दिनेश लाड यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : स्टार टेबल टेनिस खिलाडी अचंता शरथ कमल याला देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अचंता शरथ कमल हे टेबलटेनिसमधील मोठे नाव असून राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने अनेक सुवर्णपदके मिळवली आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय क्रीडा आणि युवा मंत्रालयाने सोमवारी क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. या यादीत 25 जणांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये एच. एस. प्रणय, लक्ष्य सेन, एल्डोस पॉल, महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे, बॉक्सर निखत झरिन यांच्यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. रोहितच्या प्रशिक्षकांचा सन्मान यंदा कोणत्याच क्रिकेटपटूला खेलरत्न किंवा अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही, परंतु कर्णधार रोहित शर्मा याचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

असे आहेत 2022 चे क्रीडा पुरस्कार

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार : अचंता शरथ कमल (टेबल टेनिस)

अर्जुन पुरस्कार : सीमा पुनिया (अ‍ॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अ‍ॅथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबळे (अ‍ॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एच.एस. प्रणय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निखत झरीन (बॉक्सिंग), भक्ती प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर. प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (जुदो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मल्लखांब), इलावेनिल वलारिवन (शूटिंग), ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (भारोत्तोलन), अंशु (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल संजय पाटील (पॅरा स्विमिंग), जेरलिन अनिका जे (स्पेशल बॅडमिंटन).

द्रोणाचार्य पुरस्कार : जीवनज्योत सिंह तेजा (तीरंदाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (शूटिंग), सुजित मान (कुस्ती).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंह (कुस्ती).

ध्यानचंद पुरस्कार (जीवन गौरव) : अश्विनी अकुंजी सी (अ‍ॅथलेटिक्स), धर्मवीर सिंह (हॉकी), बी.सी. सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरुंग (पॅरा अ‍ॅथलेटिक्स).

Back to top button