थेट ऑस्ट्रेलियातून : विश्वचषकाचा लेखाजोखा आणि शिकवण | पुढारी

थेट ऑस्ट्रेलियातून : विश्वचषकाचा लेखाजोखा आणि शिकवण

थेट ऑस्ट्रेलियातून; निमिष पाटगावकर : विश्वचषक इंग्लंडने जिंकला, स्पर्धा संपली आणि सर्व संघ पुन्हा आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार सामने खेळायला लागतील ते पुढच्याच वर्षी भारतात होणार्‍या पन्नास षटकांच्या विश्वचषकापर्यंत. या विश्वचषकातून आपल्याला काय बोध मिळाला ज्याचा उपयोग क्रिकेटच्या पुढील वाटचालीस उपयोगी पडेल?

संघांचे बलाबल – या विश्वचषकाने दाखवून दिले की कोणताच संघ हा लिंबूटिंबू नाही. पात्रता फेरीत वेस्ट इंडिज सारख्या संघाला गाशा गुंडाळावा लागला तर मुख्य फेरीत नेदरलँड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे चमकले. नेदरलँडचा द.आफ्रिकेविरुद्ध, झिम्बाब्वेचा पाकिस्तानविरुद्ध आणि जरी डकवर्थ लुईसने असेल, पण आयर्लंडचा विश्वचषक विजेते इंग्लंडवरचा विजय हे नशिबाचे नव्हते तर त्यांच्या उत्तम खेळाचे होते. क्रिकेटचा प्रसार जर मोजक्याच आठ किंवा बारा संघांबाहेर आयसीसीला करायचा असेल तर आयसीसीला संलग्न देशांच्या यादीतून अशा काही देशांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल. जसा अफगाणिस्तानचा संघ आज तुल्यबळ होऊन ऑस्ट्रेलियाला दमवू शकतो तसेच नवे संघही आपली गुणवत्ता दाखवायला आसुसलेले आहेत, पण त्यांना गरज आहे ती संधीची आणि आर्थिक पाठबळाची. बीसीसीआयसारखे श्रीमंत सगळेच बोर्ड नसल्याने आयसीसीला यात लक्ष घालावे लागेल.

आर्थिक सुरक्षा – हा विषय नुसता नव्या संघाबाबत नाही तर वेस्ट इंडिजसारख्या क्रिकेट जगतात अनेक दशके सत्ता गाजवलेल्या संघाचे क्रिकेट टिकायचे असेल तर त्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे. तिथला भ्रष्टाचार आणि बोर्डाचा सावळा गोंधळ बघता आयसीसीला सुरुवातीला तिथे प्रशासक नेमून हे करावे लागेल, पण तिथले क्रिकेट टिकवायला हे गरजेचे आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या श्रीलंकेलाही ही गरज लागू शकते. पाकिस्तानात आता कुठे इतर देश खेळायला जायला लागलेत, पण त्यांचाही आर्थिक डोलारा तकलादू आहे.

भारताबाबत खास बोलायचे तर भारत हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल देश असून क्रिकेटमधील त्याचा उपयोग अजूनही मर्यादितच आहे. देशातील कानाकोपर्‍यात उपलब्ध असलेली गुणवत्ता शोधायला, त्यांना प्रशिक्षण द्यायला आणि त्याची प्रगती व्हायला आपण अजून पारंपरिक पद्धती वापरतो. यामुळे कुठचा खेळाडू कुठल्या परिस्थितीत कसा खेळेल हे निव्वळ अनुभवावरून आपण जोडतो. याला गरज आहे ती पूरक डेटाची. कुठलेच तंत्रज्ञान हे माणसाच्या निर्णयक्षमतेला बाद करून प्रक्रियेचे यांत्रिकीकरण करण्यासाठी नसते तर ते माणसाच्या निर्णयक्षमतेला मदत करणारे असते. या विश्वचषकात बटलरने प्रत्येक सामन्यात गोलंदाजीत केलेले बदल, क्षेत्ररक्षण रचना हा अंतिम निर्णय त्याने मैदानात घेतला होता, पण त्यामागे प्रत्येक खेळाडूचा आणि विविध परिस्थितीत काय उपाय असतील याच्या काल्पनिक परिस्थितीचा अभ्यास होता. बीसीसीआय सारख्या श्रीमंत बोर्डाकडे या तंत्रज्ञान सुविधा असतील किंवा नक्कीच त्यांना त्या परवडतील, पण रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याचा उपयोग कुठे दिसला नाही.

विश्वचषकाची पूर्वतयारी आणि संघबांधणी आपली खूप लांबली. जेव्हा जडेजा आणि बुमराह हे आपले प्रमुख खेळाडू विश्वचषक खेळू शकणार नाहीत. हे स्पष्ट झाले तेव्हा आपण तहान लागल्यावर विहीर खोदून संघ उभा केला. पूर्वतयारी म्हणून आपण जे सहा सामने घरच्या मैदानावर खेळलो त्याचा विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून विशेष उपयोग नव्हता. कारण ऑस्ट्रेलियातील मैदानावर खेळण्याचा सराव याने मिळणार नव्हता. हे सर्व आयसीसीच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दौरे असतात हे मान्य आहे, पण जो शहाणपणा आपण द. आफ्रिकेविरुद्ध धवनच्या नेतृत्वाखालील एक दिवसीय संघ खेळवत केला तो आपला विश्वचषक संघ आधीच रवाना करून दाखवायला हवा होता. इंग्लंडने पाकिस्तानात 7 टी-20 सामन्यांच्या मालिकेत मोईन अलीच्या नेतृत्वात वेगळा संघ पाठवला तर पाकिस्तानला वेळापत्रकानुसार न्यूझीलंडमध्ये सराव मिळाला.

या विश्वचषकात चांगली कामगिरी करणार्‍या सूर्यकुमार यादवच्या ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर खेळायचा सराव म्हणून त्याने पारसी जिमखान्यावर केलेल्या तयारीची खूप चर्चा झाली. प्रश्न असा पडतो की ऑस्ट्रेलियात जाण्यास अशी एका खेळाडूला त्याच्या कल्पकतेतून तयारी का करावी लागते? जर पारसी जिमखान्यावर ऑस्ट्रेलियासद़ृश खेळपट्टी होऊ शकते तर बीसीसीआयच्या देशातील कुठल्याही मैदानाच्या सराव खेळपट्टीवर हा प्रयोग का झाला नाही. मी तर म्हणेन, मेलबर्नला जर ड्रॉप इन खेळपट्टी असेल तर भारतातील उत्तम क्युसेक वापरून आपण सरावासाठी अशा खेळपट्ट्या का करू शकत नाही. नुसती खेळपट्टी नाही तर वारा, तापमान सगळ्याचे आपण सिच्युएशन करून दौर्‍याच्या ठिकाणाचा सराव करू शकतो. पूर्वी शांततापूर्ण वातावरणात असणार्‍या न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारताच्या गोंगाटात खेळायचा सराव म्हणून कानात हेडफोन्स लावून कृत्रिम गोंगाटात सराव केला होता. बीसीसीआयकडे असे नवे प्रयोग करायला पैशाची कमतरता नक्कीच नसेल.

या विश्वचषकात आपण आणि सर्वच संघ खूप काही शिकलो. पारंपरिक पद्धतींना फाटा दिला, तंत्रज्ञानाची जोड आणि उपलब्ध डेटाचा योग्य वापर हीच यापुढे यशाची गुरुकिल्ली असणार आहे. बदल हीच एक शाश्वत गोष्ट असून ते बदल लवकरात लवकर आपण आत्मसात करून पुढील विश्वचषकाची तयारी आतापासूनच करणे गरजेचे आहे. वेळ खूप थोडा आहे.

Back to top button