INDvsENG T20WC : इंग्लंडची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक, टीम इंडियाचा 10 विकेट्स राखून पराभव | पुढारी

INDvsENG T20WC : इंग्लंडची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक, टीम इंडियाचा 10 विकेट्स राखून पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG INDvsENG T20WC 2ns Semi Final : ॲलेक्स हेल्स आणि जोश बटलर यांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये दारुण पराभव केला. या विजयासह इंग्लिश संघाने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. आता फायनलमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. 13 नोव्हेंबरला रोजी मेलबर्न फयनलची मॅच रंगणार आहे. टीम इंडियाच्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ओपनर्सनी भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. इंग्लिश सलामीवीर अॅलेक्स हेल्सने 183 च्या स्ट्राईक रेटने 86 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने 163 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी कोणतीही चूक केली नाही आणि लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज केला.

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला असून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाखराब सुरुवातीनंतर 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. विराट कोहली (50) आणि हार्दिक पंड्या (63) यांनी केलेल्या झुंझार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लिश संघासमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने 24 चेंडू राखून एकही विकेट न गमावता सामना जिंकला.

उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघ लयीत दिसला नाही. फलंदाजांनी सन्मानजनक धावसंख्या गाठली, पण गोलंदाजांनी पूर्णपणे निराश केली. सामन्यादरम्यान एकदाही भारतीय गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न करताना दिसले नाहीत. सहा पैकी चार गोलंदाजांनी 10 हून अधिक इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. इंग्लंडकडून सलामीवीर जोस बटलर (80) आणि अॅलेक्स हेल्स (86) यांनी दमदार खेळी केली. या दोघांनी एकही विकेट न गमावता इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला.

इंग्लंडच्या डावाची चांगली सुरुवात

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या बटलर आणि हेल्स या सलामीवीर जोडीने आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. बटलरने डावाच्या पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारला तीन चौकार ठोकले. त्यानंतर दुस-या आणि तिस-या षटकात चौकार-षटकार फटकावले. या जोडीने पॉवर प्ले च्या षटकांचा पुरेपुर फायदा उठवला आणि भारतीय गोलंदाजांकडून धावा वसूल केल्या. 5 व्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर झळकावले. पॉवर प्ले ची सहा षटके संपली तेव्हा त्यांची धावसंख्या बिनबाद 63 होती. यानंतर आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन अॅलेक्स हेल्सने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यावेळी इंग्लंडची धावसंख्या बिनबाद 84 होती. 10 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेल्सने हार्दिक पंड्याला षटकार खेचून संघाचे शतक धावफलकावर झळकावले. याचबरोबर बटलर-हेल्स जोडीची पहिल्या विकेट्साठी शतकी भागिदारीही पूर्ण झाली.

भारताची सुरुवात खराब

दरम्यान, भारताची सुरुवात खराब झाली. दुस-याच षटकार केएल राहुल बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या 9 होती. यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने डाव सांभाळला आणि पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये संघाला 38 धावसंख्येपर्यंत पोहचवले. या दरम्यानच्या खेळात रोहित शर्माला जीवदान मिळाले. 4.4 व्या षटकात कुरनने फेकलेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू रोहितने फटकावला. चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या उजवीकडे गेला. हवेत होता. त्यावेळी ब्रुकने डायव्हिंग करून तो पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या तळहातावर आदळून मैदानावर पडला आणि वेगाने पुढे गेला. त्यानंतर आठव्या षटकात रोहित-विराट जोडीने संघाच्या 50 धावा पूर्ण केल्या.

केएल राहुल फेल, चाहते निराश…

केएल राहुल आणि रोहित शर्माने टीम इंडियाला संयमी सुरुवात करून दिली. डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलने चौकार मारला. बेन स्टोक्सचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला होता. राहुलने बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या गॅप मधून चेंडू सीमापार पाठवला. पहिल्या षटकात भारताने सहा धावा काढल्या. मात्र, दुस-या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताला पहिला झटका बसला. ख्रिस वोक्सने केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वोक्सने पाचव्या स्टंपवर बॅक ऑफ लेंथ बॉल टाकला. त्याचवेळी चेंडूला अतिरिक्त बाउंस मिळाला. राहुलने बॅकफूटवर जात कट करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिरिक्त बाऊन्समुळे त्याच्याकडून चूक झाली. चेंडू बॅटची कडा घेऊन विकेटकीपर बटलरकडे गेला आणि इंग्लंडला पहिले यश मिळाले. हताश झालेला राहुल जड पावलांनी पॅव्हेलियनकडे निघून गेला.

रोहित शर्मा मोठ्या खेळीपासून वंचित…

नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भारताला दुसरा धक्का बसला. ख्रिस जॉर्डनने इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहितला सॅम करणने झेलबाद केले. रोहित 27 चेंडूत 28 धावा करून तंबूत परतला. यादरम्यान भारतीय कर्णधाराने चार चौकार मारले. यावेळी भारताची धावसंख्या नऊ षटकांत दोन बाद 57 धावा होती. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रीझवर आला. रोहितला मिळालेल्या जीवदानचा फायदा घेता आला नाही. त्याला 28 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. जॉर्डनने चौथ्या स्टंपवर गुड लेन्थ फॉरवर्ड चेंडू फेकला. चेंडूच्या खेळपट्टीवर पडताच तो मिडविकेटवर भिरकावण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप मिडविकेट फॉरवर्डला गेला. इथे करणने झेल घेतला. रोहित-विराट जोडीने तिस-या विकेटसाठी 47 धावांची भागिदारी केली.

सूर्यकुमार यादव अपयशी…

रोहित बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादव कडून मोठ्या आशा होत्या. पण तो आज इंग्लिश संघाविरुद्ध तो अपयशी ठराला. मैदनात उतरताच सूर्याने सुरुवात चांगली केली. त्याने एक चौकार आणि षटकार मारून आपण पुन्हा एकदा मोठी खेळी करू अशी आशा चाहत्यांना लावली. पण त्याला 12 व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर आदील राशिदने बाद केले. राशिदने लेग ब्रेक चेंडू टाकला. तो ऑफ-स्टंपच्या बाहेर पडला. यावेळी जागा तयार करून चेंडू अतिरिक्त कव्हरवर मारण्याचा प्रयत्न सूर्याने केला. परंतु चेंडू बॅटवर नीट आदळला नाही आणि स्वीपर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. हा भारताला मोठा धक्का होता.

विराट कोहली-हार्दिक पंड्याची अर्धशतकी भागिदारी

हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कोहली 50 धावा करून जॉर्डनचा बळी ठरला. भारताने 136 धावांवर चौथी विकेट गमावली. हार्दिक पांड्या शेवटच्या चेंडूवर आऊट झाला. त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या.

हार्दिकचा पॉवर प्ले धमाका…

विराट कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत 63 धावा केल्या. हार्दिकचा स्ट्राईक रेट 190 होता. एका क्षणी 150 पेक्षा कमी धावसंख्या असलेल्या भारताने 168 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले.

अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघ पराभूत

अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचे रेकॉर्ड खराब आहे. आतापर्यंत येथे 11 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान नाणेफेक हरलेल्या संघाने प्रत्येक वेळी सामना जिंकला आहे. भारताने येथे दोन टी 20 सामने खेळले आहेत – 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध. दोन्हीमध्ये भारताने नाणेफेक गमावून सामना जिंकला.

इंग्लंड संघात दोन बदल झाले आहेत, तर भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे. दुखापतग्रस्त डेव्हिड मलान आणि मार्क वुड यांच्या जागी इंग्लंडने फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डनचा समावेश केला आहे. यावेळीही ऋषभ पंत भारताकडून यष्टिरक्षक म्हणून खेळणार आहे.

अॅडलेडच्या मैदानावर कोहलीची बॅट नेहमीच तळपली आहे. येथे दोन टी-20 सामने खेळले गेले असून त्यात कोहलीने दोन्हीमध्ये अर्धशतक झळकावले आहे. त्याचा स्ट्राइक रेट 150 पेक्षा जास्त आहे.

टीम इंडिया फॉर्मात

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सुपर 12 मध्ये त्याने 5 पैकी 4 सामने जिंकले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना गमावला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय केएल राहुल पुन्हा लयीत दिसत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने अर्धशतक केले होते.

या विश्वचषकात सूर्यकुमार आणि कोहली टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सिद्ध झाले आहे. सूर्याने तीन अर्धशतके फटकावली आहेत. तर त्याचे 360 डिग्रीतील फटक्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे. भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विश्वचषकात टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीसह भुवनेश्वर कुमारनेही या स्पर्धेत चमकदार गोलंदाजी केली आहे. भुवीने 5 सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडकडे मजबूत फलंदाजी

इंग्लंड संघाचा सर्वात मजबूत पैलू म्हणजे त्याची फलंदाजी. संघाकडे 9 व्या क्रमांकापर्यंतचे फलंदाज आहेत. अशा स्थितीत या फलंदाजीला सामोरे जाणे भारतासमोर मोठे आव्हान असेल. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम कुरनही फॉर्मात आहे. त्याने 4 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडने ग्रुप 1 मध्ये 4 सामने खेळले. त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसात वाहून गेला होता.

भारत (प्लेइंग इलेव्हन) :

केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन) :

जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद

भारताने सुपर 12 फेरीतील पाचपैकी चार सामने जिंकून ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. तर दुसरीकडे ग्रुप 1 मध्ये इंग्लंडने तीन सामने जिंकले आणि त्या गटात दुस-या क्रमांकावर समाधान मानले. आज ग्रुप 2 मधील अव्वल भारत आणि ग्रुप 2 मधील दुस-या क्रमांकाचा इंग्लिश संघ यांच्यात स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना थोड्याच वेळात ॲडलेड ओव्हल येथे रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल. तर सामन्याचा टॉस 1 वाजता होणार आहे.

अॅडलेडच्या मैदानावर कोहलीची बॅट नेहमीच तळपली आहे. येथे दोन टी-20 सामने खेळले गेले असून त्यात कोहलीने दोन्हीमध्ये अर्धशतक झळकावले आहे. त्याचा स्ट्राइक रेट 150 पेक्षा जास्त आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात टीम इंडिया ऋषभ पंत की दिनेश कार्तिक यांच्यापैकी कुणाला संधी देणार आहे. हे टॉस नंतरच समजणार आहे.

Back to top button